नवी दिल्ली : नीट पेपर लीक प्रकरणावर आज सर्वोच्च न्यायालयाने एनटीए (नॅशनल टेस्टिंग एजन्सी) ला महत्त्वपूर्ण आदेश दिले आहेत. एनटीएला नीट-यूजी २०२४साठी बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे शहरनिहाय आणि केंद्रनिहाय निकाल त्यांच्या वेबसाइटवर शनिवारी दुपारी 12 वाजेपर्यंत अपलोड करण्याचे निर्देश दिले. तसेच या प्रकरणी सोमवारी (22 मे) रोजी सकाळी 10.30 वाजता पुन्हा सुनावणी निश्चित केली आहे.
सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्या. जे. बी. पार्दीवाला व न्या. मनोज मिश्रा यांच्या खंडपीठासमोर वादग्रस्त ठरलेल्या राष्ट्रीय पात्रता सहपरीक्षा-पदवी २०२४ (नीट-यूजी २०२४) शी संबंधित सर्व याचिकांवर आज सुनावणी पार पडली. एनटीएने सर्व उमेदवारांचे निकाल प्रसिद्ध न केल्याने केंद्रनिहाय मार्किंग पॅटर्न शोधू शकले नाहीत, अशी तक्रार याचिकाकर्त्यांनी केली होती. याचिकाकर्त्यांनी म्हटले की, नीट-यूजी २०२४ परीक्षेचा निकाल वेबसाइटवर प्रकाशित करणे योग्य होईल. ज्यामुळे उमेदवारांना मिळलेल्या केंद्रनिहाय गुणांवर काही पारदर्शकता येईल. या परीक्षेत विद्यार्थ्यांनी मिळवलेले गुण प्रकाशित करा आणि प्रत्येक केंद्र आणि शहराच्या संदर्भात विद्यार्थ्यांची ओळख गुप्त ठेवली जाईल याची देखील खबरदारी घ्यावी.
सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी केंद्रनिहाय निकाल जाहीर करण्याच्या निर्देशाला कडाडून विरोध केला. मात्र, पटना आणि हजारीबागच्या केंद्रांमध्ये पेपर लीक झाल्याचे सरन्यायाधीशांनी तोंडी मान्य केले. पेपर लीक त्या केंद्रांपुरतीच मर्यादित आहे की इतर शहरे आणि केंद्रांमध्ये पसरली आहे, हे तपासण्यासाठी निकालांच्या संपूर्ण डेटाचे विश्लेषण करणे महत्त्वाचे आहे. तसेच सोमवारी बिहार पोलीस आणि ईओडब्ल्यूचे अहवालही सादर केले जावेत, असे निर्देश दिले.
खंडपीठाने सुरुवातीला एनटीएला शुक्रवारी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत निकाल प्रकाशित करण्याचे निर्देश दिले. त्यावर प्राधिकरणाचे वरिष्ठ वकील नरेश कौशिक यांनी 23 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांचे निकाल असल्याने अधिक वेळ देण्याची विनंती केली. त्यानुसार खंडपीठाने शनिवारपर्यंत मुदत वाढवली. दरम्यान, २४ जुलैपासून नीट-यूजीचं काऊन्सलिंग सुरू होईल, असे एनटीएने न्यायालयात सांगितले.
ठोस पुरावा असायला हवा
वैद्यकीय प्रवेश परीक्षा नीट-यूजी 2024 नव्याने घेण्यासाठी संपूर्ण परिक्षा प्रक्रियेवर परिणाम झाला असल्याचा ठोस पुरावा असायला हवा. आम्ही या प्रकरणावर लवकरच अंतिम निकाल देऊ. तसेच सीबीआयही तपास करत आहे. त्या तपासात काही निष्पन्न झाल्यास त्याचा तपासावर निश्िचतच परिणाम होईल. लाखो तरुण विद्यार्थी निकालाची वाट पाहत आहेत. आम्हाला सर्व बाजू तपासून, पुरावे पाहून निकाल द्यायचा आहे. असे सर्वोच्च न्यायालयाने नमूद केले.