नवी दिल्ली: भाजप नेते व माजी केंद्रीय मंत्री चिन्मयानंद यांनी आपली लैंगिक छळवणूक केल्याचा आरोप करणारी उत्तरप्रदेशातील युवती सहा दिवस अचानक बेपत्ता झाली होती. ही मुलगी आता राजस्थानात सापडली असून या प्रकरणात संबंधीत मुलीला कोर्टात आमच्यापुढे सादर करा, आम्ही तिच्याकडून वस्तुस्थिती ऐकून घेऊ इच्छितो असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. या मुलीचा चिन्मयानंद यांनीच अपहरण केल्याचा आरोप केला जात होता. परंतु उत्तरप्रदेश पोलिसांनी त्याचा इन्कार केला आहे.
ही मुलगी उत्तरप्रदेशातील शहाजहानपुर येथील आहे. ती राजस्थानात सापडल्यानंतर आता तिला तिच्या आई वडिलांकडे नेले जात आहे, तिचे अपहरण झालेले नव्हते असे उत्तरप्रदेश पोलिसांच्यावतीने कोर्टात सांगण्यात आले. ही मुलगी विधी महाविद्यालयाची विद्यार्थीनी आहे. स्वामी चिन्मयानंद यांनी आपल्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप सदर मुलीच्या वडिलांनी केला आहे. त्यानुसार त्यांनी तशी रितसर पोलिस तक्रारही दाखल केली आहे. ही मुलगी ज्या विधी महाविद्यालयात शिकत होती ते महाविद्यालय चिन्मयानंद यांच्या आश्रमातर्फेच चालवले जात आहे.
चिन्मयानंद यांनी आपल्यावर अत्याचार केल्याचा आरोप या मुलीनेही केला होता. त्यानंतर ही मुलगी अचानक बेपत्ता झाली. त्या पार्श्वभूमीवर वकिलांच्या एका गटाने सरन्यायाधिशांना एक निवेदन सादर करून या प्रकरणाची स्वताहून दखल घेण्याची विनंती सुप्रीम कोर्टाला केली होती. त्यानुसार कोर्टाने ही दखल घेत सदर मुलीला सादर करण्याचा आदेश दिला होता. दरम्यान या मुलीच्या कुटुंबियांना जीवे मारण्याच्याही धमक्या आल्या आहेत.