व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी
पुणे – आम्हालाही नमाज अदा करण्यासाठी मस्जिदमध्ये प्रवेश करू द्या, अशी मागणी करणारी जनहित याचिका पुणे येथील उच्चशिक्षित मुस्लीम दाम्पत्य फराह शेख आणि अन्वर शेख (रा. दापोडी, पुणे) यांनी थेट सर्वोच्च न्यायालयात फेब्रुवारी महिन्यात केली होती. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठासमोर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी झाली.
त्यावेळी आपले म्हणणे मांडण्यासाठी केंद्र सरकारसह, वक्फ बोर्ड, महिला आयोग, अल्पसंख्यांक आयोग आणि पुण्यातील त्या मस्जिदला सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एस. एस. बोपन्ना आणि न्यायमूर्ती हृषिकेश रॉय यांच्या खंडपीठाने नोटीस बजावली आहे.
ही याचिका फेब्रुवारी 2020 मध्ये सर्वोच्च दाखल झाली होती. या प्रकरणात लॉकडाऊनच्या काळात बुधवारी (20 मे) ऑनलाइन सुनावणी झाली. याचिकाकर्त्यांचे वकील ऍड. संदीप तिवारी आणि ऍड. रामेश्वर गोयल यांनी बाजू मांडली. त्यामध्ये त्यांनी महिलांनी मस्जिद प्रवेश करण्याची आणि नमाज अदा करण्याची परवानगी मिळावी म्हणून त्यांनी पुण्यातील मोहमदिया जामा मशिदीतील अधिकाऱ्यांना 1 मे 2019 रोजी पत्र लिहिले होते; परंतु त्यांना त्यांच्या वतीने कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. मस्जिदमध्ये महिलांना प्रवेश नाकारला जात असल्याच्या मुद्द्यावरून अखेर ही जनयाचिका दाखल करावी लागली.