50 टक्के मतांच्या व्हीव्हीपॅट पडताळणीबाबत सुप्रीम कोर्टाची निवडणूक आयोगाला नोटीस

नवी दिल्ली – लोकसभा निवडणूक 2019 मध्ये 50 टक्के मतांच्या व्हीव्हीपॅट पडताळणीबाबत सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला नोटीस पाठविली आहे. कोर्टाने विरोधी पक्षाच्या याचिकेवर सुनावणी करताना शुक्रवारी आयोगाला नोटीस पाठविली आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीत प्रत्येक मतदान केंद्रात झालेल्या मतदानापैकी 50 टक्के मतांची मतदानयंत्रातून व 50 टक्के मतांची व्हीव्हीपॅटमधून मोजणी केली जावी. या दोन्हींची पडताळणी करून नंतरच निकाल जाहीर केला जावा, अशी मागणी 21 विरोधी पक्षांनी याचिकेव्दारे केली होती. या प्रकरणावर सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखाली सुनावणी झाली.

सुनावणी दरम्यान कोर्टाने निवडणूक आयोगाला सांगितले की, आयोगाने 25 मार्चपर्यंत आपले उत्तर दाखल करायाचे आहे. याचदिवशी या प्रकरणी पुढली सुनावणी होईल. तसेच सुनावणीमध्ये सहाय्य करण्यासाठी निवडणूक आयोगाचा एक जबाबदार अधिकारी उपस्थित राहणे यावेळी गरजेचे आहे.

दरम्यान, तेलगु देसमचे अध्यक्ष व आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू हे याचिकेतील मुख्य याचिकाकर्ते आहेत. याआधी 21 विरोधी पक्षांच्या नेत्यांनी निवडणूक आयोगाची भेट घेऊन अशीच मागणी केली होती. मात्र मुख्य निवडणूक आयुक्तांनी निवडणुकीची घोषणा करताना जी माहिती दिली त्यावरून ही मागणी अमान्य झाल्याचे स्पष्ट झाल्याने या पक्षांनी कोर्टात धाव घेतली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.