नवी दिल्ली – न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्याशी संबंधित रोकड प्रकरणाची चौकशी सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या समितीने सुरू केली. समितीच्या तिन्ही सदस्यांनी मंगळवारी वर्मा यांच्या निवासस्थानाला भेट देऊन पाहणी केली.
वर्मा यांच्या निवासस्थानाच्या आवारातील स्टोअर रूमला काही दिवसांपूर्वी आग लागली. ती आग दिल्ली अग्निशमन दलाने विझवली. त्यावेळी मोठ्या प्रमाणात रोकड आढळल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्याने सनसनाटी निर्माण झाली. त्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने चौकशीसाठी समिती स्थापन केली. त्या समितीच्या चौकशीतून काय निष्पन्न होते; त्यावर वर्मा यांचे भवितव्य अवलंबून असल्याचे मानले जाते.
समितीचे सदस्य पाहणीसाठी आले तेव्हा वर्मा त्यांच्या निवासस्थानी उपस्थित होते का याविषयीची माहिती तातडीने मिळू शकली नाही. वर्मा यांनी याआधीच रोकड प्रकरणापासून स्वत:ला दूर ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. मी किंवा माझ्या कुटूंबीयांनी स्टोअर रूममध्ये रोकड ठेवली नसल्याचा दावा त्यांनी याआधीच केला. मात्र, रोकड प्रकरणाची न्याय्य चौकशी करण्याची मागणी विविध स्तरांतूून केली जात आहे. वर्मा यांना हटवण्यासाठी महाभियोगाची प्रक्रिया चालवली जावी, अशी भूमिका विरोधी पक्षांनी घेतली आहे.