शबरीमलात प्रवेश नाकारलेल्या महिलेची सर्वोच्च न्यायालयात याचिका

नवी दिल्ली – केरळमधील शबरीमला मंदिरात प्रवेश करण्यापासून रोखलेल्या एका महिलेने सर्वोच्च न्यायालयामध्ये दाद मागितली आहे. बिंदू अम्मिनी असे या महिलेचे नाव असून पोलिस आयुक्‍तांकडे मदत मागायला गेली असता आयुक्‍तांच्या कार्यालयाबाहेर तिच्यावर हल्लाही झाला, असे सर्वोच्च न्यायालयात सांगण्यात आले.

या प्रकरणी सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी याचिका दाखल करून घेतली आहे. शबरीमला देवस्थानात सर्व वयोगटाच्या महिलांना प्रवेश देण्यात यावा, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. मात्र केरळ राज्याच्या अधिकाऱ्यांकडून महिलांना प्रवेश दिला जात नाही, असे या महिलेने आपल्या याचिकेत म्हटले आहे. या प्रकरणी पुढील आठवड्यात लवकरात लवकर सुनावणी घेतली जाईल, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. बुधवारीही फातिमा नावाच्या आणखी एका महिलेनेही अशीच याचिका सर्वोच्च न्यायालयात दखल केली आहे.

पाच न्यायाधीशांच्या घटनापिठाने गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये 4-1 अशा बहुमताने शबरीमला येथील भगवान अय्यप्पा यांच्या देवस्थानामध्ये सर्व वयोगटाच्या महिलांना प्रवेश दिला जावा, असे आदेश दिला होता. शारीरिक निकषांवरील भेद हा समानतेच्या मूलभूत अधिकारांचे भंग करणारा असल्याचे न्यायालयाने म्हटले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.