नवी दिल्ली : : नवज्योत सिंह सिद्धू यांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा झटका दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने 34 वर्ष जुन्या प्रकरणात सिद्धू यांना तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. 1988 मध्ये झालेल्या एका पार्किंगच्या वादातून सिद्धू यांनी एका वृद्धाला मारहाण केली होती. त्यानंतर उपचारा दरम्यान त्या वृद्धाचा मृत्यू झाला. याआधी नवज्योत सिंह सिद्धू यांना दिलासा मिळाला होता. मात्र, पीडितांच्या कुटुंबियांकडून पुनर्विचार याचिका दाखल केली होती. त्यावर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने सिद्धू यांना एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
नवज्योत सिंग सिद्धू यांच्या 34 वर्षे जुन्या रोडरेज केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने आज महत्वपूर्ण निर्णय दिला. यापूर्वी पंजाब-हरियाना उच्च न्यायालयाने सिद्धूंना सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यात तीन वर्षांचा तुरुंगवास ठोठावला होता. तर सर्वोच्च न्यायालयाने सिद्दूला या आरोपांतून मुक्त केले होते, तसेच मारहाण प्रकरणी एक हजार रुपयांचा दंड ठोठावला होता. पण, आता त्यांना एका वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
27 डिसेंबर 1988 मध्ये ही घटना घडली होती. सिद्धूने पटियालामध्ये रस्त्याच्या मधोमध जिप्सी पार्क केली होती. या मार्गावरून मृत 65 वर्षीय व्यक्ती आणि अन्य दोघे बँकेत पैसे काढण्यासाठी जात होते. यावेळी त्यांनी सिद्धूला गाडी बाजुला घेण्यास सांगितले. यातून वाद झाला आणि सिद्धू आणि त्याच्या सहकाऱ्याने मारहाण केली. या मारहाणीत एकाचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी आरोप केला होता की, सिद्धू हे मारहाण करून पसार झाले होते.
सप्टेंबर 1999 मध्ये कनिष्ठ न्यायालयाने नवजोत सिंग सिद्धूला निर्दोष सोडले होते. परंतू उच्च न्यायालयाने डिसेंबर 2006 मध्ये सिद्धू आणि अन्य एकाला दोषी ठरवत तीन वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्यावर सिद्धूने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्यानंतर आता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर मृताच्या नातेवाईकांनी रिव्हू पिटीशन दाखल केली होती. त्यावर आज न्यायालयाने महत्वाचा निर्णय दिला.