जुन्नर तालुक्‍यातील 42 ग्रामपंचायतींचा आंदोलनाला पाठिंबा

पिंपळगाव जोगा उपविभागीय कार्यालय नगरला नेण्यास विरोध

आळेफाटा- सरकारने नारायणगाव (ता. जुन्नर) येथील पिंपळगाव जोगा उपविभागीय कार्यालय नगर जिल्ह्यात नेण्याचा निर्णयाच्या विरोधात आळेफाटा (ता. जुन्नर) येथे सुरू करण्यात आलेले आंदोलन आज (दि. 10) दुसऱ्या दिवशीही सुरूच असून, या आंदोलनाला जुन्नर तालुक्‍यातील पूर्व पट्टयामधील गावांमधून मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत असून, 42 ग्रामपंचायतींनी आंदोलनास पाठिंबा असल्याचे लेखी पत्र दिले आहे.

शासनाने कुकडी सिंचन मंडळ पुणे अंतर्गत येणारे नारायणगाव येथील पिंपळगाव जोगे उपविभागीय कार्यालय सिंचन व्यवस्थापनासाठी पारनेर तालुक्‍यातील आळकुटी या ठिकाणी हलविण्याच्या निषेधार्थ जुन्नर तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवा नेते अतुल बेनके यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी (दि. 9) सकाळी

10 वाजता आळेफाटा (ता. जुन्नर) येथील शिवाजी पुतळ्याजवळ आंदोलन केले होते. सरकार निर्णय रद्द करत नाही तोपर्यंत आपले ठिय्या आंदोलन सुरूच असेल अशी भूमिका घेऊन हे आंदोलन सुरू ठेवण्यात आले आहे. या आंदोलनाचा दुसरा दिवस असल्याने या ठिकाणी सकाळी आठ वाजल्यापासूनच नागरिक भेट देऊन पाठिंबा देत होते. सकाळपासून सुमारे सहा हजार नागरिकांनी आंदोलनस्थळी भेट देऊन आपला पाठिंबा दर्शविला, तर जुन्नर तालुक्‍यातील 42 ग्रामपंचायतींनी या आंदोलनास पाठिंबा असल्याची लेखी पत्रे दिली आहेत.

या आंदोलनादरम्यान राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर असलेल्या अनेक नेत्यांनी दूरध्वनीवरून आंदोलनाची माहिती घेतली. सोमवारी (दि. 9) रात्री जिल्हा पषद सदस्या आशा बुचके यांनीही आंदोलनाच्या ठिकाणी येऊन अतुल बेनके यांची भेट घेतली आणि त्यांना पाठिंबा दर्शविला.

  • सरकारने 4 सप्टेंबरला जीआर काढला आहे, त्याची माहिती आम्हाला 7 तारखेला मिळाली आणि 9 तारखेला आंदोलन करण्यात आले. बुधवारी (दि. 11) हे कार्यालय या ठिकाणाहून हलविण्यात येणार आहे, त्यामुळे याबाबत सरकारने लवकरात लवकर निर्णय घेऊन या आदेशाला स्थगिती द्यावी, जोपर्यंत सरकार आदेशाला स्थगिती देत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार आहे.
    – अतुल बेनके, युवा नेते, राष्ट्रवादी कॉंग्रेस
You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×