नावीन्यपूर्ण व्यवसाय सुरू करण्यासाठी इन्क्युबेशन केंद्राकडून मार्गदर्शनही मिळणार
पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या “सेंटर फॉर इनोव्हेशन, इन्क्युबेशन अँड लिंकेजेस’तर्फे नावीन्यपूर्ण व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्यांकडून (स्टार्ट अप्स) प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. यामध्ये निवड होणाऱ्या व्यवसायांना विद्यापीठाच्या इन्क्युबेशन केंद्राकडून मार्गदर्शन व पाठबळ उपलब्ध करून दिले जाणार आहे.
इलेक्ट्रिक मोबिलिटी, ऍग्रिटेक, बिग डेटा, मटेरियल सायन्स, एन्व्हायर्न्मेंट टेक्नॉलॉजी, एड्यु टेक्नॉलॉजी व सोशल सेक्टर, या विषयांमधील व्यवसायासाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. त्यासाठी विद्यापीठाच्या शेवटच्या वर्षाचे विद्यार्थी, माजी विद्यार्थी, प्रत्यक्ष जमिनीवर काम करणारे एनोवेटर किंवा एखाद्या कंपनीचा भाग असलेले असे कोणीही प्रस्ताव दाखल करू शकतील.
प्रस्ताव पाठवण्यासाठी विद्यापीठाच्या वेबसाइटवर नमुना दिलेला आहे. त्यानुसार दि.30 नोव्हेंबरपूर्वी किंवा त्या दिवसापर्यंत प्रस्ताव पाठवावे, असे आवाहन विद्यापीठाच्या इनोव्हेशन केंद्रातर्फे करण्यात आले आहे. यापैकी निवड झालेले प्रस्तावांचे उद्योग, गुंतवणूक व स्टार्टअप क्षेत्रातील तज्ज्ञांकडून परीक्षण करण्यात येईल.
त्यानंतर मार्गदर्शन व पाठिंब्यासाठी निवडलेल्या व्यवसायांना विविध प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. त्यात मेन्टॉर उपलब्ध करून देणे, मार्केटिंग, कायदेशीर व आर्थिक बाबींसंदर्भात मार्गदर्शन यांचा समावेश आहे. याशिवाय त्यांना जागाही उपलपब्ध करून देणे, स्टार्टअप्स संबंधीचे प्रशिक्षण, बीज-भांडवलासंबंधी मदत या गोष्टींही पुरवल्या जाणार आहेत.
विद्यापीठाच्या “इन्क्युबेशन केंद्रा’त सध्या 11 स्टार्टअप कंपन्या कार्यरत आहेत. त्यांच्याकडून नावीन्यपूर्ण उत्पादने निर्माण करण्यात आली आहेत. त्यापैकी काही गेल्या सहा महिन्यांमध्ये उभी राहिली आहेत.
या केंद्राला “महाराष्ट्र स्टेट इन्क्युबेशन सोसायटी फॉर इन्क्युबेशन सेंटर’तर्फे अनुदानही मिळाले आहे. या केंद्राने टीआयई, केपीआयटी, पुणे स्मार्ट सिटी एसपीयू अशा विविध कंपन्यांशी सामंजस्य करार केले आहेत. त्यांच्याकडून स्टार्टअप्ससाठी आवश्यक पाठिंबाही मिळवला आहे.
नावीन्यपूर्ण कल्पना असलेल्या युवकांना त्यांचा व्यवसाय मोठा करण्यासाठी व्यासपीठ मिळवून देणे आवश्यक आहे. इनक्युबेशन केंद्रातर्फे विद्यापीठ स्टार्टअप्सना असे पाठबळ मिळवून देऊ इच्छिते.
– डॉ. अपूर्वा पालकर, संचालक, इन्क्युबेशन सेंटर
इलेक्ट्रिकल मोबिलिटी, बिग डेटा, एन्व्हायर्न्मेंट टेक्नॉलॉजी, सामाजिक उद्योजकता या क्षेत्रात स्टार्टअप निर्माण करण्यावर विद्यापीठाचे लक्ष आहे. त्याद्वारे युवक हे रोजगार मागणारे नव्हे, तर रोजगार देणारे असावेत असा आमचा मानस आहे.
– डॉ. नितीन करमळकर, कुलगुरू