fbpx

काळ्या फिती बांधत सीमाभागातील मराठी बांधवांना पाठिंबा द्या – जयंत पाटील

मुंबई – सीमाभागातील मराठी भाषिक बांधवांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार 1 नोव्हेंबरला महाविकास आघाडी सरकारमधील सर्व मंत्री काळ्या फिती बांधत कामकाज पाहणार आहेत. जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी याबाबत माहिती दिली आहे.

‘माझ्या सहकाऱ्यांनो, बेळगावसह संयुक्त महाराष्ट्र व्हावा या मागणीसाठी बेळगाव व सीमाभागात 1 नोव्हेंबर रोजी काळा दिवस पाळला जातो. सीमाभागतील नागरिकांना पाठिंबा दर्शवण्यासाठी महाविकास आघाडी सरकारचे संपूर्ण मंत्रिमंडळ यंदा 1 नोव्हेंबर रोजी काळ्या फिती बांधत कामकाज पाहणार आहेत.

राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टी, महाराष्ट्र प्रदेशाच्या सर्व पदाधिकारी, युवक, युवती, इतर सेल व कार्यकर्त्यांनी येत्या 1 नोव्हेंबर रोजी आपणही काळ्या फिती बांधत सीमाभागातील मराठी बांधवांना आपला पाठिंबा द्या. सीमाभागातील मराठी बांधवांचा आवाज बुलंद करू, दडपशाहीचा धिक्कार करू,’ असं ट्विट करत जयंत पाटील यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे.

1 नोव्हेंबर 1956 रोजी कर्नाटक राज्याची स्थापना झाली होती. तेव्हापासून सीमाभागातील मराठी भाषिकांवर अन्याय केला जात आहे. सीमाभागात असणारी मराठी भाषिक गावं अनेक मार्गांनी महाराष्ट्रात येण्यासाठी प्रयत्न करतात. मात्र, कर्नाटक सरकार त्यांची आंदोलने आणि प्रयत्न दडपून टाकतात. ही गावं महाराष्ट्रात येण्यासाठी न्यायालयीन लढाई सुरू आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.