विकासकामांसाठी महायुतीला साथ द्या

संजय थोरात : राजाराम बाणखेलेंच्या प्रचारार्थ पाबळ येथे कोपरासभा

मंचर- आंबेगाव विधानसभा मतदारसंघातील रखडलेली विकासकामे करण्यासाठी महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार राजाराम बाणखेले यांना निवडून द्यावे, असे आवाहन आंबेगाव तालुका भाजपाचे अध्यक्ष संजय थोरात यांनी केले.

राजाराम बाणखेले यांच्या प्रचारार्थ पाबळ (ता. शिरूर) येथे झालेल्या कोपरासभेत थोरात बोलत होते. यावेळी शिवसेनेचे तालुकाध्यक्ष अरुण गिरे, जयश्री पलांडे, जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य भानुदास काळे, कार्याध्यक्ष रवींद्र त्रिवेदी, किसन चपटे, अमित वाळुंज, किरण वाळुंज, कोंडिभाऊ आदक यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

संजय थोरात म्हणाले की, भाजप सरकारच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात वैयक्तिक लाभार्थ्यांसहित इतर योजना दिल्या आहेत. आंबेगाव विधानसभा मतदारसंघात अनेक विकासाची कामे रखडली आहे. केंद्रात असलेल्या भाजप-शिवसेना सरकारच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विकासकामे झाली आहेत. राज्यात विकासकामे गतीमान करण्यासाठी बदल हवा आहे. राज्यात शिवसेना-भाजप सरकारला अनुकुल वातावरण असून त्यांचा फायदा मतदारांना होण्यासाठी दोन्ही पक्ष प्रयत्नशील राहणार आहेत.

येथील विधानसभा मतदारसंघाचा विकास गतीमान करण्यासाठी राजाराम बाणखेले यांना निवडून दिले पाहिजे. त्यांच्या माध्यमातून विकासकामे होतील. भाजप सरकार विकासाचे जनक आहे. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीने कोणताही शाश्‍वत विकास केला नाही. भ्रष्टाचाराला उत्तेजन देण्याचे काम होत असल्याने सर्वसामान्य मतदार प्रचंड नाराज आहे. देशात भाजपचे सरकार आहे. राज्यात भाजपाचे सरकार निवडून दिल्यास शाश्‍वत विकास होईल, असे त्यांनी नमूद केले. यावेळी उमेदवार राजाराम बाणखेले, जयश्री पलांडे, अरुण गिरे यांच्यासह विविध मान्यवरांची भाषणे झाली.

Leave A Reply

Your email address will not be published.