राजगुरूनगर, (प्रतिनिधी) – घरातील व्यक्ती म्हणून सर्वांनी प्रचार करत आमदार दिलीप मोहिते पाटील यांना साथ द्या. आपले मत घड्याळाच मिळाले पाहिजे, असे आवाहन महिला व बालविकास कल्याण विकास मंत्री अदिती तटकरे यांनी केले.
खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघात अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी सोमवारी (दि.28) उमेदवारी अर्ज भरला. यावेळी त्यांच्यासोबत माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, प्रदेश सदस्य डी. डी. भोसले, तालुका अध्यक्ष कैलास सांडभोर, भाजपचे कालिदास वाडेकर उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी अनिल दौंडे यांनी मोहिते यांचा अर्ज स्वीकारला.
उमेदवारी दाखल करण्यापूर्वी त्यांनी खेड कृती उत्पन्न बाजार समितीच्या मैदानावर सभा घेतली. यावेळी तटकरे बोलत होत्या. यावेळी भाजपाचे नेते डॉ. राम गावडे, महिला जिल्हा उपाध्यक्षा कांचन ढमाले, जिल्हा दूध संघाचे संचालक अरुण चांभारे, जिप माजी अध्यक्षा निर्मला पानसरे, भाजप तालुका अध्यक्ष शांताराम भोसले, रिपाई तालुका अध्यक्ष दिलीप नितनवरे, गणेश सांडभोर, सुरेखा मोहिते पाटील,
मंगल चांभारे, अरुण चौधरी, कैलास लिंभोरे, शांताराम देशमुख, कालिदास वाडेकर, नवनाथ होले, विनायक घुमटकर, सिद्धार्थ कांबळे, हनुमंत कड, विलास कातोरे, रुपाली जाधव, संध्या जाधव, मनीषा टाकळकर, सुरेश शिंदे, पप्पू टोपे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनें उपस्थित होते. उमेदवारी अर्ज भरताना आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केले.
आदिती तटकरे म्हणाल्या, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे तिघे भाऊ जसे राज्यभर ओळखले जातात तसेच खेड तालुक्यात आमदार दिलीप मोहिते पाटील हे देखील आपले भाऊ आहेत.
त्यांनी खेड तालुक्यातील 1 लाख 17 हजार महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ दिला आहे. त्याची जाण तालुक्यातील महिला नक्की ठेवतील. महायुतीच्या सरकारने अनेक कल्याणकारी योजना राबविल्या आहेत. गाडीवर एकवेळ झेंडा लावला नाही तरी चालेल परंतु मनात घड्याळ चिन्ह ठेवून आमदार दिलीप मोहिते पाटील यांना निवडून द्या.
राज्यात सर्वाधिक निधी खेड तालुक्यात आणायचे काम आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी केले आहे. आम्ही गेली 20 वर्षे एकमेकांच्या विरोधात होतो मात्र विकासकामांमध्ये आम्ही दोघे दूर राहिलो नाही.
लोकसभेला जरी माझा पराभाव झाला असला तरी रात्रंदिवस दिलीप मोहिते पाटील यांनी माझ्यासाठी काम केले. मी शब्द देतो दिलीप मोहिते पाटील यांना निवडून आणण्याची जबाबदारी जशी सर्वांची आहे तशीच ती माझीही आहे या निवडणुकीत प्रचंड बहुमताने निवडून येतील.- शिवाजीराव आढळराव पाटील, अध्यक्ष, म्हाडा, पुणे
राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मला भावासारखे आहेत. त्यांच्या माध्यमातून खेड तालुक्यात विकासाची गंगा आणली. मी काम करणारा माणूस आहे. राजकारणात ज्याने त्याने आपली पायरी पाहून वागावे. राजकारणात मी कधी चुकीचे वागलो नाही.
अजित पवार कर्तबगार नेते आहेत ताकदीचा नेता असावा लागतो तरच जिल्हा आणि राज्य चालते. दिलीप मोहितेचे लाड अजित पवार यांनी केले म्हणून मी त्यांच्या मागे मी आहे. खेड तालुक्यात त्यांच्यामाध्यमातून मोठा निधी मिळाला.-दिलीप मोहिते पाटील, उमेदवार, खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघ