गावजत्रा मैदानावरील सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद
पिंपरी – भोसरी विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार माजी आमदार विलास लांडे यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार महेश लांडगे यांची कुंडली भोसरीतील सभेत जनतेसमोर मांडली. भयमुक्त आणि भ्रष्टाचारमुक्त भोसरीसाठी जनतेने आपल्याला साथ द्यावी, अशी साद लांडे यांनी घातली.
भोसरीतील गावजत्रा मैदानावर झालेल्या प्रचार सभेत लांडे बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस शहराध्यक्ष संजोग वाघेरे, विरोधी पक्षनेते नाना काटे, माजी महापौर मोहिनी लांडे, डॉ. वैशाली घोडेकर, स्थायी समितीच्या माजी सभापती सुमन पवळे, मनसेचे गटनेते सचिन चिखले, नगरसेवक समीर मासुळकर, अजित गव्हाणे, राहुल भोसले, पंकज भालेकर, प्रवीण भालेकर, विक्रांत लांडे, नगरसेविका अनुराधा गोफणे, माजी नगरसेवक पंडित गवळी, मोहम्मद पानसरे, जालिंदर शिंदे, सतीश भोसले, गणपत आहेर, सतीश थिटे, संदीपान झोंबाडे, भरत लांडगे, ईश्वर ठोंबरे, दत्ता गव्हाणे यांच्यासह कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीतील घटक पक्षांचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
सभेत बोलताना विलास लांडे म्हणाले, मी हवेली विधानसभा मतदार संघातून पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आलो. त्यावेळी नगरसेवकपदाचा राजीनामा देऊन महेश लांडगे यांना नगरसेवकपदी निवडून आणले. त्यावेळी अजित पवार यांनी विरोध केला मात्र मी माझे नाते जपले. आता ते ज्या ऑफिसमध्ये बसतात, तेही माझेच आहे. मी त्याला नगरसेवक केले. मतदारसंघात मुरूम चोरी सुरु आहे. टपरीवाले, रिक्षावाले आणि बस चालकांकडून हफ्ते गोळा केले जातात. तरुणांवर चांगले संस्कार करण्याऐवजी त्यांना वाम मार्गाला लावले जात आहे. संपूर्ण मतदारसंघात दहशत आहे. पण जनतेने काळजी करण्याचे कारण नाही.
कोणाच्या केसालाही धक्का लागला, तर विलास लांडे सोबत आहे. येत्या 21 तारखेला कपबशी चिन्हावर मतदान करून ही दहशत, हफ्तेगिरी, भंगारचोरी आणि दादागिरी मतदारसंघातून कायमची हद्दपार करा, असे आवाहन लांडे यांनी मतदारांना केले. दत्ता साने म्हणाले, मागील निवडणुकीत खोट्या आश्वासनाला बळी पडून दैवतासमान विलास लांडे यांच्या विरोधात काम केले. त्या चुकीबद्दल मी विलास लांडे यांची माफी मागतो. आताच्या आमदाराला मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी मदतीचा पवित्रा घेतला होता. त्याचा आज मला पश्चात्ताप होत आहे. प्रायश्चित करण्यासाठी व हिशोब चुकता करण्यासाठी निवडणुकीत विलास लांडे यांना निवडून आणणार आहे.
आताचे आमदार स्थायी समिती सभापती असताना भोसरी उड्डाणपुलाजवळ शीतलबाग येथे 70 लाखाचा पादचारी पूल साडेसात कोटींना उभारण्यात आले. मोशीत वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पात एका माजी पालकमंत्र्यांच्या नातेवाईकाची आणि या आमदाराचे साटेलोटे आहे. पंतप्रधान आवास योजनेची कामे तीनच ठेकेदारांना वाटून यांनी टक्केवारी लाटण्यात आली. कोणताही कामधंदा नसताना त्यांच्याकडे दीड कोटींची गाडी आली कोठून? असा सवाल दत्ता साने यांनी केला.
विलास लांडे हे आमदार असताना त्यांच्या पत्नी मोहिनी लांडे महापौर होत्या. त्यावेळी लांडे यांनी महापालिकेत येऊन कधी कोणाकडे चिरीमिरी मागितल्याचे आम्ही ऐकले सुद्धा नव्हते. आजची परिस्थिती एक गेला की दुसरा आला, तो गेला की तिसरा आला तो गेल्यानंतर चौथा येतो आणि गोळा करून जातो, असा कारभार सुरू आहे. चऱ्होलीत अक्षरशः लूटमार सुरू आहे. तेथील शेतकऱ्यांना व बिल्डरांना लुटले जात आहे. विजेचे मीटर देतानाही कोट्यवधींचा भ्रष्टाचार केला जात आहे. नागरिक चुकीला माफी देणार नाहीत, असा विश्वास दत्ता साने यांनी व्यक्त केला.