भाजपविरोधी लढ्यासाठी ममतांना पाठिंबा द्या-तृणमूल

कोलकता, दि.13 -भाजपविरोधी लढ्यासाठी कॉंग्रेस आणि डाव्या पक्षांनी पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना पाठिंबा द्यावा, असे आवाहन बुधवारी त्या राज्यातील सत्तारूढ तृणमूल कॉंग्रेसने केले. अर्थात, त्या आवाहनाला उपहासाची झालर होती.

पश्‍चिम बंगालमधील विधानसभा निवडणूक तीन-चार महिन्यांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे तेथील राजकीय पटलावर शाब्दिक फटकेबाजी सुरू झाली आहे. त्यामध्ये भर घालताना तृणमूलचे खासदार सौगत रॉय यांनी भाजपवर टीकास्त्र सोडतानाच कॉंग्रेस आणि डाव्या पक्षांना शाब्दिक चिमटे काढले.

भाजपकडून जातीय आणि विभाजनवादी राजकारण केले जात आहे. त्याविरोधातील धर्मनिरपेक्ष राजकारणाचा खरा चेहरा ममता याच आहेत. त्यामुळे कॉंग्रेस आणि डावे पक्ष खरोखरीच भाजपविरोधी असतील; तर त्यांनी ममतांच्या पाठिशी उभे राहावे, असे ते पत्रकारांशी बोलताना म्हणाले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष त्या पक्षाचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार असतील का, या प्रश्‍नावर रॉय यांनी घोष यांची राजकीय अनुभवावरून खिल्ली उडवली. निवडणुकीत कुणाला चेहरा बनवायचे हा त्या पक्षाचा अंतर्गत विषय आहे. मात्र, घोष अलिकडेच म्हणजे 2015 मध्ये राजकारणात आले. त्यांच्यापेक्षा तृणमूलच्या युवक शाखेचे अध्यक्ष अभिषेक बॅनर्जी यांचा राजकीय अनुभव मोठा आहे. तसे असूनही बॅनर्जी यांनी तृणमूलचा चेहरा बनण्याचा दावा केलेला नाही, असे रॉय यांनी म्हटले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.