सविंदणे – कवठे येमाई (ता. शिरूर) येथील नंदा मल्हारी डोळस या महीलेवर रात्रीच्या वेळी एका युवकाने अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला होता. त्याला विरोध केल्याने डोक्यात दगडी पाटा घालून आरोपीने तीला गंभीर जखमी केले होते. त्यांच्यावर पुणे येथील ससुन रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.
निधनानंतर त्यांची गतिमंद मुलगी निराधार झाली. लहानपणीच पितृछत्र हरपले होते. अत्यंत हलाखीची परीस्थीती असल्याने आई दुसऱ्यांच्या घरी भीक्षा मागून उदरनिर्वाह करत होती. आईच्या मृत्यूनंतर छत्र हरपल्याने कुणाचाही आधार या मुलीला राहीला नव्हता. या तपासादरम्यान तपास अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप कांबळे यांनी ही परीस्थीती पाहील्यावर त्यांनाही अश्रू अनावर झाले. गुन्ह्यातील फरार आरोपीला तात्काळ गजाआड केले. व गतीमंद मुलीला तिचे पुर्नवसन करण्यासाठी कर्तव्याची जाणीव ठेवून मदतीसाठी प्रयत्न केले.
त्यांच्या हाकेला प्रतिसाद देत शिरूर येथे गतीमंद मुलींचे संगोपन व शाळा चालवणाऱ्या राणीताई चोरे व कवठे येमाई गावचे माजी सरपंच दिपक रत्नपारखी यांनी पुढाकार घेत उस्मानाबाद येथील स्वआधार गतिमंद मुलींचे बालगृह येथे तात्काळ दाखल करण्यात आले. या वेळी दिपक रत्नपारखी, राणीताई चोरे, गणेश सातव, केदारी, सोपान वागदरे, अक्षय गायकवाड व सहकारी उपस्थित होते. सदर संस्थेस कवठे येमाई ग्रामस्थांच्या वतीने 25 हजार रुपये देणगी देण्यात आली. निराधार मुलीला मदत करणाऱ्या कर्तव्यदक्ष पोलिस अधिकारी व सामाजिक कार्यकर्त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.