शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनीकडून पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये मदत
पुणे – करोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर केलेल्या लॉकडाऊनमुळे शहरातील व्यवहार ठप्प झाले आहे. यामुळे हातावर पोट असणाऱ्यांना मोठ्या प्रमाणावर फटका बसला आहे. याला आपल्या कलेतून प्रबोधन आणि मनोरंजन करणारे कलाकार देखील अपवाद नाहीत. या कलाकारांसाठी आता शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनीने मदतीचा हात पुढे केला आहे.
प्रबोधिनीच्या वतीने पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवडमधील गरजू लोककलावंतांना “कृतज्ञतेचा शिधा’ देण्यात येत आहे. लॉकडाऊनच्या कालावधीत सुमारे 29 लोककलावंतांच्या घरी जाऊन कै. शाहीर हिंगे स्मृती शिधा योजनेंतर्गत शिधा दिला आहे. यामध्ये गोंधळी, कीर्तनकार, शाहीर, लावणी कलावंत, मुरळी, वादक, पोतराज आदी कलावंतांचा समावेश आहे. या मदतींतर्गत एका कुटुंबाला गहू, तांदूळ, डाळी, कडधान्य, तेल आदी 14 जीवनावश्यक साहित्याचा समावेश असणारा शिधा दिल्याची माहिती प्रबोधिनीकडून सांगण्यात आले.
चैत्र महिन्यापासून गावोगावच्या जत्रा, उत्सव, यात्रांना सुरुवात होते. लोक वर्षभर या उत्सवांची वाट पाहत असून, यांना वर्षांनुवर्षांची परंपरा असते. मात्र, यंदा या परंपरेला खंड पडला आहे. काही गावांमध्ये या यात्रांच्या सुरुवातीला कीर्तन, गोंधळ असे कार्यक्रम होतात. तर यात्रेच्या दिवसांमध्ये लोकनाट्याचे (तमाशा) कार्यक्रम होता. पण, यंदा हे कार्यक्रमच रद्द झाल्याने अनेक लोककलावंतांवर बिकट परिस्थिती ओढवली आहे. याशिवाय यावर्षी “लग्न मुहुर्ता’मध्ये विघ्न आल्याने गोंधळ्यांना देखील आर्थिक संकटांना सामोरे जावे लागत आहे.
कार्यक्रम रद्दचाही फटका…
चैत्र महिन्यापासून विविध कार्यक्रमांना सुरुवात होते. पण करोनामुळे हे सर्व कार्यक्रम रद्द झाले. त्यामुळे लोककलावंतांना मोठा फटका बसला आहे. कार्यक्रम रद्द झाल्याने रोज मिळणारी हजेरी, मानधनाचा मार्ग बंद झाला आहे. अनेक लोककलावंतांची उपजीविका कलेवरच अवलंबून असून, त्यांचे न भरून निघण्यासारखे नुकसान झाले आहे. अनेक कलाकारांना त्यांच्या अडचणी स्पष्टपणे सांगणे देखील अवघड जात होते. ही परिस्थिती लक्षात घेत प्रबोधिनीच्या वतीने मदत करण्यात येत आहे, असे प्रबोधिनीचे अध्यक्ष शाहीर हेमंत मावळे यांनी सांगितले.