वल्लभनगर आगाराला शैक्षणिक सहलींचा आधार

आगारातून रोज सरासरी 4 ते 6 बसेस : साडेसात लाखांचा महसूल

पिंपरी – राज्य परिवहन महामंडळाच्या (एस.टी) पिंपरी-चिंचवड येथील वल्लभनगर आगारातून शैक्षणिक सहलीचे प्रमाण वाढले आहे. डिसेंबर 2019 या एकाच महिन्यात 60 शैक्षणिक सहलीतून आगाराला साडेसात लाखांचा महसूल मिळाला आहे.

शैक्षणिक सहल म्हटले की, महामंडळाच्या लालपरीचे चित्र डोळ्यासमोर येते. मात्र, अलिकडच्या काळात महामंडळाच्या व शैक्षणिक संस्थाच्या जाचक अटीमुळे एसटी कडे शैक्षणिक संस्थानी पाठ फिरवली होती. मात्र, गेल्या दोन तीन महिन्यात महामंडळाच्या वतीने शैक्षणिक सहलीला प्रोत्साहन देण्यासाठी खास पत्रक काढून राज्यातील प्रत्येक आगाराला सूचना दिल्याने आगारांच्या शैक्षणिक सहलीमध्ये वाढ होतांना दिसत आहे.

राज्य परिवहन महामंडळाचा महसूल वाढविण्यासाठी महामंडळाच्या प्रशासनाने कंबर कसल्याने यासाठी विभागस्तरावर अधिकारी नियुक्त करून शैक्षणिक सहलींना प्रोत्साहन दिले जाणार आहे. तसेच, सहलींसाठी जेवढ्या बस शाळांकडून मागणी केल्या जातील तेवढ्या उपलब्ध करून देण्याचाही महामंडळाने निर्णय घेतला असल्याने व शैक्षणिक संस्थानी देखील सकारात्मक निर्णय घेतला आहे. याचाच परिणाम म्हणून वल्लभनगर आगारातून सहलीसाठी दिवसाला सरासरी 4 बसेस जात आहेत. यातून डिसेंबर 2019 एकाच महिन्यात 60 शैक्षणिक सहली आगारातून गेल्या असून यातून आगाराला 7 लाख 52 हजार 40 रुपये इतका महसूल मिळाला आहे.

राज्यभरातील शैक्षणिक संस्थांकडून दरवर्षी सहली काढल्या जातात. सुरक्षित प्रवास म्हणून एसटीच्या बसेसना मोठी मागणी असायची. मात्र गेल्या काही वर्षांत जुन्या, खराब बसेस, मागणी एवढ्या बसेसची उपलब्धता न होणे, सहली दरम्यान बसेस बंद पडणे यासह अनेक अडचणी येत होत्या. यामुळे महामंडळाच्या बसऐवजी खासगी बसकडे शैक्षणिक संस्थांचा ओढा वाढल्याने महामंडळाचा महसूल घटला होता. मात्र, महामंडळाचे हक्काचे उत्पन्न खासगी बसधारकांनी त्यांच्याकडे वळविल्यानंतर महामंडळाने परत शैक्षणिक संस्थांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

सवलतीचा फायदा
यामुळे शैक्षणिक सहलीसाठी प्रासंगिक करारावर मागणी एवढ्या तसेच चांगल्या दर्जाच्या बसेस उपलब्ध करुन द्याव्यात, असे निर्देश आगारांना दिले आहेत. बसेस मिळण्यासाठी ज्या जाचक अटी आहेत, त्या कमी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. शैक्षणिक सहलीसाठी एसटीकडून 33 टक्केच तिकीट आकारणी केली जाते. तर, 67 टक्के सवलत दिली जाते. याचा जास्तीत-जास्त फायदा विद्यार्थ्यांना मिळावा हा देखील हेतू आहे. प्रशासनाकडून सुरू असलेल्या या विशेष नियोजनामुळे शैक्षणिक संस्था एसटीकडे आकर्षित होण्यास सुरुवात होताना दिसत आहे. येत्या काळात आणखी काय पाऊले घेतले जातात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)