विकासाला साथ द्या : आशुतोष काळे

कोपरगाव  – आजारांचे माहेरघर होऊन बसलेल्या कोपरगाव शहराला धुळगाव असे चेष्टेने संबोधले जाते.रस्त्यांची दुरावस्था झाल्यामुळे कोपरगाव शहरातील छोटे-मोठे व्यवसाय धोक्‍यात आले असून हि परिस्थिती बदलण्यासाठी विकासाला साथ द्या व शहराचा चेहरामोहरा बदला असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार आशुतोष काळे यांनी केले.

कोपरगाव शहरातील प्रभाग क्रमांक 6 मध्ये आयोजित कॉर्नर सभेत काळे बोलत होते. ते म्हणाले की, कोपरगाव शहराचा अतिशय जिव्हाळयाचा असलेला पाणीप्रश्न सोडविण्यासाठी सत्ता नसतांना देखील मागील पाच वर्षापासून सातत्याने प्रयत्न केले आहे. माजी आमदार अशोकराव काळे यांनी 4 नंबर साठवण तलावाच्या विस्तारीकरणासाठी आणलेला निधी परत जावू नये, यासाठी वारंवार आंदोलने करून शासनस्तरावर पाठपुरावा केला. कोपरगाव शहराच्या विकासासाठी मी आजपर्यंत सर्वोतोपरी सहकार्य केलेले आहे.

4 व 5 नंबर साठवण तलावाचे काम कोपरगाव नगरपालिकेने तातडीने सुरु करावे, यासाठी प्रमाणिक प्रयत्न करून मागील पाच वर्षापासून आजपर्यंत जेवढे जिल्हाधिकारी आले. त्या सर्व जिल्हाधिकाऱ्यांना समक्ष भेटून निवेदन देवून साठवण तलावाचे काम सुरु करण्यासाठी प्रयत्न केले. 9 दिवस धरणे आंदोलन सुद्धा केले. याचे कोपरगाव शहराचे नागरिक साक्षीदार आहेत. आपल्या शेजारील शहरांप्रमाणे आपल्याही कोपरगाव शहराचा सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी सेवा करण्याची संधी द्या, कोपरगाव शहराचा चेहरा मोहरा बदलवून दाखविल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास त्यांनी उपस्थितांना दिला. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे, शहराध्यक्ष सुनील गंगुले, नगरसेविका प्रतिभा शिलेदार, नगरसेवक मंदार पहाडे आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.