कलावंतांचा चंद्रकांत पाटील यांना पाठिंबा

पुणे – पुणे हे सांस्कृतिक शहर आहेच, या शहराचे महत्त्व वाढावे, यासाठी कलेच्या जोपासनेसाठी आवश्‍यक ते सर्व करू, असे आश्‍वासन भाजपचे कोथरूड विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी दिले.

कोथरूडमधील चित्रपट, नाटक, संगीत, साहित्य, नृत्य आणि कला क्षेत्रातील कलाकारांच्या सहभागाने स्नेह मेळाव्याचे आयोजन केले होते. त्यावेळी पाटील यांनी त्यांच्याशी संवाद साधला.

या कार्यक्रमाला ज्येष्ठ साहित्यिक द. मा. मिरासदार, सिने दिग्दर्शक राजदत्त, ज्येष्ठ संगीत नाट्य अभिनेत्री कीर्ती शिलेदार, इतिहास अभ्यासक डॉ. गो. ब. देगलूरकर, प्रसिद्ध सिने अभिनेते दिग्दर्शक प्रवीण तरडे, प्रसिद्ध सतार वादक उस्ताद उस्मान खॉं साहेब यांच्यासह मराठी चित्रपट, नाटक, संगीत, साहित्य, नृत्य आणि अन्य कला क्षेत्रांतील कलाकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गेल्या 5 वर्षांत आपल्या सरकारने पोटाची भूक भागविणाऱ्या ग्रामीण भागावर लक्ष केंद्रीत करून, येथील जनतेसाठी अनेक योजना राबवल्या. आता पोटाच्या भुकेबरोबरच कला-संस्कृतीच्या माध्यमातून करमणुकीची, बुद्धीची भूक भागवणेही गरजेचे आहे. यासाठी पुढील 5 वर्षांत युती सरकारचा नक्‍कीच प्रयत्न करेल, असे आश्‍वासन पाटील यांनी यावेळी दिले. सांस्कृतिक क्षेत्रातही सकस अभिरूची जोपासण्यासाठी आगामी काळात आकांक्षी प्रकल्प हाती घेतले जातील, असेही पाटील यांनी यावेळी नमूद केले.

पाटील यांच्या कोथरूडमधील उमेदवारीवर राजकारण करणाऱ्यांना लक्ष्य करून सिनेदिग्दर्शक आणि अभिनेते प्रवीण तरडे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यशैलीच्या प्रभावामुळे आज भारताला जगमान्यता मिळाली आहे. संपूर्ण जगात भारताचा डंका वाजत आहे. मग अशावेळी पाटील यांच्या पाठीशी कोथरूडची जनता नक्‍कीच उभी राहील. तसेच सर्व कलाकारांनी पाटील यांच्या मागे खंबीरपणे उभे राहून, सोशल मीडिया अथवा इतर माध्यमांद्वारे मतदारांना आवाहन केले पाहिजे.

Leave A Reply

Your email address will not be published.