जिल्ह्यात मागणीनुसार दुधाचा पुरवठा

पुणे – अतिवृष्टीमुळे राज्यातील अनेक शहरांमध्ये पुराने थैमान घातले आहे. पुणे जिल्ह्यालादेखील त्याचा फटका बसला आहे. त्याचा दैनंदिन दूध संकलनावरदेखील परिणाम झाला असून पुणे शहर, पिंपरी-चिंचवडबरोबरच जिल्ह्यातील नागरिकांना दूधाची कमतरता भासू नये, याकरिता दूध उत्पादक संघांनी दूग्धजन्य पदार्थांची निर्मिती थांबविली आहे.

पुण्यामध्ये पुणे जिल्हा दूध उत्पादक संघाबरोबरच खासगी दूध उत्पादकांकडून दूध पुरवठा केला जातो. त्यापैकी जिल्हा उत्पादक संघाकडून जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात दूध पुरवठा केला जातो. मात्र, गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या पावसाचा फटका दूध संकलनाला बसला आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागांमधील पूल पाण्याखाली गेल्याने दूध संकलन कमी होऊ लागले आहे. हे प्रमाण दैनंदिन संकलनाच्या 15 टक्‍क्‍यांनी घटले आहे.

याबाबत चितळे दूध डेअरीचे केदार चितळे म्हणाले, दररोज पुणे जिल्ह्यात 4 लाख लिटर दुधाचा पुरवठा केला जातो. आमचा दूध प्रकल्प सांगलीपासून काही अंतरावर असल्याने आतापर्यंत पुण्यातील दूध पुरवठा सुरळीत सुरू आहे. पुणे जिल्ह्यातील मागणीनुसार दररोज दूध पुरवठा केला जात आहे.

जिल्हा दूध उत्पादक संघाच्या दूध संकलनात 15 टक्‍के घट झाली असली, तरीदेखील दैनंदिन दूध पुरवठ्यावर त्याचा परिणाम होऊ नये, याकरिता काही ठराविक दूग्धजन्य पदार्थांची निर्मिती थांबविण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ग्राहकांना त्याची झळ बसणार नाही, याची आम्ही खबरदारी घेतली आहे.
– विष्णू हिंगे, अध्यक्ष, पुणे जिल्हा दूध उत्पादक संघ

Leave A Reply

Your email address will not be published.