नवी दिल्ली – देशभरात सध्या सुरू असलेली “कोविड 19′ संसर्गाची साथ आटोक्यात आणण्यासाठी आवश्यक वैद्यकीय साहित्याचा पुरवठा करण्यासाठी एयर इंडिया आणि भारतीय हवाई दलाने देशाच्या दक्षिण, पूर्व आणि ईशान्येकडील भागांसाठी मालवाहू विमानांची सेवा सुरू केली आहे.
करोनाशी लढण्यासाठी आवश्यक रसायने, संप्रेरके, वैद्यकीय उपकरणे, चाचणीसाठी लागणारे किट,वैयक्तिक संरक्षणाची साधने, मास्क, हातमोजे आणि आरोग्यसेवेसाठी लागणारी सामग्री आणि त्या भागातील राज्य सरकारे आणि केंद्रशासित प्रदेशांनी केलेल्या मागणीनुसार इतर आवश्यक सामानाचा यात समावेश आहे.
एयर इंडियाने बेंगळूरूला पाठविलेल्या विमान फेऱ्यांमधून नागालॅंड, केरळ, कर्नाटक, मेघालय या भागांसाठी वैद्यकीय साहित्य तर कोईम्बतूर साठी वस्त्रोद्योग मंत्रालयाचे सामान पाठविण्यात आले. भारतीय हवाई दलाने गोवाहाटीला पाठविलेल्या विमानांतून वैयक्तिक संरक्षणाची साधने तसेच भारतीय वैद्यकीय संशोधन मंडळाच्या चाचणी किट्स पाठविण्यात आली. या कामात मदत करण्यासाठी इंडिगो,स्पाईसजेट तसेच ब्लू डार्ट सारख्या खासगी विमान सेवांनी देखील व्यावसायिक तत्वावर वेमान सेवा सुरू केली आहे.
दिल्ली, मुंबई, हैदराबाद, बेंगळूरू, तसेच कोलकाता येथे माल हब तयार करण्यात आले आहेत. तिथून दूरस्थ वाहतुकीसाठी गुवाहाटी, दिब्रुगढ, आगरताळा, ऐझवाल, इम्फाळ, कोइम्बतूर तसेच तिरुवनंतपूरम येथे संपर्क केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत.