पुरवठा विभाग खासगी व्यक्‍तींच्या दावणीला

शिरूर तालुक्‍यात बेकायदेशीर कामांना खतपाणी

– शेरखान शेख

शिक्रापूर – शिरूर तालुक्‍यामध्ये तहसील कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या अनेक जमिनींचे बेकायदेशीर हस्तांतरण झाल्याचे कित्येक प्रकार उघडकीस आल्याची घटना ताजी असतानाच शिरूर तालुक्‍याच्या तहसील कार्यालयातून धान्यांचा पुरवठा तसेच शिधापत्रिका बनविण्याचे काम शासकीय व्यक्‍तींकडून न होता खासगी व्यक्‍तींकडून होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे शिरूर तालुक्‍यातील पुरवठा विभाग खासगी व्यक्‍तींच्या दावणीला बांधला असल्याचे विदारक चित्र दिसत आहे.

शिरूर तहसील कार्यालयाचे तहसीलदार रणजीत भोसले यांची बदली झाल्यानंतर फेब्रुवारी 2019 मध्ये नव्याने रुजू झालेले तहसीलदार गुरु बिराजदार यांनी शिरूरचा कारभार स्वीकारला. यानंतर तहसील कार्यालयामधील माहिती घेतली असताना त्यांना पुरवठा विभागाचा कारभार खासगी व्यक्‍ती पाहत असल्याचे निदर्शनास आले. त्यांनतर त्यांनी मार्च 2019 मध्ये तातडीने तहसील कार्यालयातील पुरवठा विभागात एका शासकीय कर्मचाऱ्याची नेमणूक केली होती. त्यांनतर आधी पुरवठा विभाग सांभाळत असलेला खासगी व्यक्‍तीला त्याठिकाणी येण्याबाबत मनाई केलेली होती. बिराजदार यांनी त्या ठिकाणी शासकीय कर्मचारी नियुक्‍त केल्यानंतर पुरवठा विभागाचा कारभार सुरळीत सुरु होता. त्यानंतर तत्कालीन तहसीलदार बिराजदार यांनी काही दिवस तेथे नेमलेल्या कर्मचाऱ्याच्या जागेवर तोंडी पद्धतीने दुसऱ्या शासकीय कर्मचाऱ्याची नियुक्‍ती केली. सोमवारी (दि. 9) बिराजदार यांची बदली होताच ती व्यक्‍ती पुन्हा तहसीलच्या पुरवठा विभागात कार्यरत झाली आहे.

काही अधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपामुळे आजही शिरूर तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागाचा कारभार शासकीय व्यक्तीच्या हाती नसून एका खासगी व्यक्तीच्या हाती सोपवला आहे. यामुळे नागरिक, रेशन दुकानदारांची पिळवणूक होत आहे. खासगी व्यक्‍तींकडून अनेक बेकायदेशीर कामे होत असल्याबाबत तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे खासगी व्यक्‍तीला तेथून मुक्‍त करून शासकीय व्यक्‍तीची नेमण्याची, त्याला पाठीशी घालणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी होत आहे.

बेकायदेशीर कामांची पुनरावृत्ती?
शिरूर तालुक्‍यातील अनेक ठिकाणी जमिनींचे बेकायदेशीर हस्तांतरण झालेल्या घटना घडलेल्या आहेत. यात अधिकारी व कर्मचाऱ्यांना जबाबदार ठरविण्यात आले आहे. तहसीलदार कार्यालयातील पुरवठा विभागात शिधापत्रिका बनविण्याचे, लिहिण्याचे काम खासगी व्यक्‍ती करीत आहे. अनेक बेकायदेशीर कामे सुद्धा होत आहेत. त्यामुळे शिरूर बेकायदेशीर कामांची पुनरावृत्ती होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.

ज्येष्ठ नागरिकांना अरेरावी
शिरूर तहसील कार्यालयातील पुरवठा विभाग सांभाळणाऱ्या खासगी व्यक्‍तीकडून नागरिकांसह ज्येष्ठ नागरिक, रेशनधान्य विक्री करणाऱ्या दुकानदारांना अरेरावी केल्याच्या अनेक घटना यापूर्वी घडलेल्या आहेत. देखील पुरवठा विभागातील खासगी व्यक्‍ती आज देखील कार्यरत आहेत. त्यामुळे या व्यक्‍तीला पाठबळ कोणते अधिकारी व कर्मचारी देत आहेत. झारीतील शुक्राचार्य शोधण्याची वेळ आता प्रशासनावर आली आहे.

तहसीलदार लैला शेख म्हणाल्या की, शिरूर तहसील कार्यालयाचा पुरवठा विभागातील या प्रकारामध्ये मी स्वतः गांभीर्याने लक्ष घालून सखोल चौकशी करणार आहे. संबंधितांवर त्वरित कारवाई करणार आहे.
– लैला शेख, तहसीलदार

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)