10वी, 12वीचे वेळापत्रक : अभिप्राय व सूचना सोमवारपर्यंत सादर करा
राज्यातील विभागीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सचिवांना सूचना
पुणे – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने दहावी व बारावीची पुरवणी परीक्षा 6 ऑक्टोबरमध्ये घेण्यात येणार आहे. याबाबतचे संभाव्य वेळापत्रकही जाहीर करण्यात आले आहे.
फेब्रुवारी-मार्च 2020 मध्ये दहावी, बारावीची नियमित परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेत काही विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. ए.टी.के.टी.साठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांसाठी पुरवणी परीक्षा जुलै-ऑगस्टमध्ये होत असते. यंदा मात्र, करोनाचा प्रादुर्भाव असल्याने ही परीक्षा ऑक्टोबरमध्ये घेण्यात येणार आहे. इयत्ता दहावीची लेखी परीक्षा 6 ते 23 ऑक्टोबर या कालावधीत होणार आहे.
इयत्ता बारावीची सर्वसाधारण व द्विलक्षी अभ्यासक्रमांची परीक्षा 6 ते 29 ऑक्टोबर या कालावधीत होणार आहे. बारावीची व्यवसाय अभ्यासक्रमाची परीक्षा 6 ते 24 ऑक्टोबर या कालावधीत होणार आहे. संभाव्य वेळापत्रकाबाबत अभिप्राय, सूचना व दुरुस्त्या ई-मेल द्वारे 17 ऑगस्टपर्यंत राज्य मंडळास सादर कराव्यात. त्यानंतर आलेल्या सूचना, दुरुस्त्या विचारात घेतल्या जाणार नाहीत, अशा सूचना राज्य मंडळाचे सचिव डॉ.अशोक भोसले यांनी राज्यातील विभागीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सचिवांना दिल्या आहेत.
‘त्या’ परीक्षा 1 ते 23 ऑक्टोबर
इयत्ता दहावीची प्रात्यक्षिक, श्रेणी व तोंडी परीक्षा 1 ते 23 ऑक्टोबर या कालावधीत होणार आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांची कार्यशिक्षण विषयाची लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा 24 ते 31 ऑक्टोबर या कालावधीत होणार आहे. आऊट ऑफ टर्न परीक्षा 24 ऑक्टोबर रोजी होईल. इयत्ता बारावीची प्रात्यक्षिक, श्रेणी व तोंडी परीक्षा 1 ते 29 ऑक्टोबर या कालावधीत होणार आहे. पूर्व व्यावसायिक अभ्यासक्रम विषयाची प्रात्यक्षिक परीक्षाही याच कालावधीत घेण्याचे नियोजन आहे. स्टेनोग्राफी इंग्रजी विषयाची प्रात्यक्षिक परीक्षा 3 ऑक्टोबर रोजी, स्टेनोग्राफी मराठी विषयाची प्रात्यक्षिक परीक्षा 5 ऑक्टोबर तर आऊट ऑफ टर्नची परीक्षा 31 ऑक्टोबर रोजी घेण्यात येणार आहे.