‘तंत्रशुद्ध’ उपचार-मंत्रमुग्ध’ गायनाचा अनोखा मिलाफ

गायनामध्ये करियर करायचे, असा विचार करून शास्त्रीय संगीताचे धडे घेतले. मात्र, संगीतातून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करण्यापेक्षाही वेदनेने दु:खी असलेल्या रुग्णांना संजीवनी मिळवून देण्याचे “कौशल्य’ निसर्गाने त्यांच्या हाती दिले. या नैसर्गिक देणगीतूनच ऍक्‍युपंक्‍चरिस्ट सौ. सुमिता सातारकर यांनी आतापर्यंत हजारो रुग्णांना उपचार देऊन त्यांना वेदनामुक्त केले आहे. ध्येय बदलले, तरीही सुमिता सातारकर यांनी आजही गायनाची आवड जपली आहे. “तंत्रशुद्ध उपचार’ आणि “मंत्रमुग्ध करणारे गायन’ हीच त्यांची ओळख असे म्हटले तर वावगे ठरणार नाही…

सुमिता सातारकर यांचे शिक्षण पुण्यातील रेणुका स्वरूप शाळेमध्ये झाले. शास्त्रीय संगीताचे धडे घेतल्यानंतर नॅचरोपॅथीचा अभ्यास करताना ऍक्‍युपंक्‍चर या विषयाची गोडी अधिक वाढली. ऍक्‍युपंक्‍चर म्हटल्यावर ही चिनी उपचारपद्धती आहे, असे सर्वांना वाटते. मात्र, पाच हजार वर्षांपूर्वी प्राचीन प्रगल्भ भारतात जो वैद्यकीय इतिहास सांगितला गेला, त्यामध्ये या पद्धतीचा उल्लेख असल्याचे सातारकर सांगतात. दुर्लक्षित झालेली ही उपचार पद्धती डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांनी भारत-चीन युद्धानंतर पुन्हा सुरू केली. त्यावेळी सरकारकडून डॉ. द्वारकानाथ कोटणीस मेमोरियल केंद्र सुरू झाले.

ऍक्‍युपंक्‍चर पद्धती आत्मसात करण्यासाठी सातारकर यांनी प्रथमत: मुंबई येथील इंटरनॅशनल ऍकॅडमीमध्ये चिनी मास्टरकडे शिक्षण घेतले. मात्र, हे शिक्षण अपूर्णच आहे, यामध्ये अजून खूप शिकण्यासारखे आहे, असे विचार त्यांच्या मनात वारंवार येत होते. त्यांनी पुणे, मुंबई, दिल्ली, कलकत्ता, चेन्नईसह लंडन, अमेरिका आणि चीनमध्ये जाऊन शिक्षण घेतले. त्या क्षेत्रातील सर्वोच्च शिक्षण आत्मसात करून भारतात आल्यावर त्यांनी पुण्यातील नवीपेठ येथे ऍक्‍युपंक्‍चर क्‍लिनिक सुरू केले. रुग्णांना उपचार देत असताना, ज्या रुग्णाला क्‍लिनिकपर्यंत येणे शक्‍य नाही, त्यांना घरी जाऊन उपचार दिले जातात. मात्र, या पद्धतीबाबत अनेकांना माहिती नाही. त्यामुळे व्यक्ती बरा होऊ शकतो; याची खात्री नव्हती. त्यामुळे ही उपचारपद्धती नेमकी काय आहे, कशाप्रकारे केली जाते, कोणत्या आजारांवर होते याबाबत सुमिता सातारकर यांनी शहरासह ग्रामीण भागात व्याख्यानांतून प्रबोधन केले. अनेक रुग्णांना उपचार दिले, त्याचा रुग्णांना फायदा झाला. मात्र, झाले उलटे. ‘एक बाई येतात, काहीतरी उपचार करतात आणि जादू झाल्यासारखे काही तासांतच बरे वाटते.’ अशी चर्चा सुरू झाली. अखेर नागरिकांना ‘ही जादू नसून, नैसर्गिक उपचारपद्धती आहे,’ हे स्लाइड शो-द्वारे दाखवून-पटवून दिले. गेली 23 वर्षे ऍक्‍युपंक्‍चर उपचारपद्धतीत सातारकर झोकून देऊन काम करत आहेत.

ऍक्‍युपंक्‍चर उपचार पद्धती साधारण 40 रोगांवर करता येते. सर्दी, खोकला, डोकेदुखी, डोळे, कान, सांधेदुखी, ऍसिडीटी, थायरॉइड ग्रंथीचे विकार, पिंपल्स, किडनी स्टोन, केस गळणे, स्थूलता, वंध्यत्व हे प्रमुख आजार आहेत. सध्याचे धकाधकीचे जीवन आणि फास्टफुडच्या जमान्यात आरोग्याच्या समस्या अधिक उद्‌भवत आहेत. त्यामध्ये संधीवात, वंध्यत्व आणि स्थूलता या आजारांवर उत्तम रिझल्ट मिळत असल्याचे सुमिता सातारकर यांनी सांगितले. या उपचारपद्धतीमुळे मधुमेह, रक्तदाब उत्तमपद्धतीने नियंत्रित करता येतो. त्यासाठी अचूक निदान, अचूक मेरिडिअन्स व बिंदूची निवड ही उपचारासाठी लागणारी योग्य पद्धती आहे. ही पद्धती करताना अनेक चांगले वाईट अनुभवही आले. मात्र, वाईट अनुभव बाजूला ठेवून क्‍लिनिकमध्ये येणाऱ्या रुग्णांच्या वेदना कमी कसा होतील, त्यासाठीच नेहमी अट्टाहास असल्याचे सातारकर नेहमी सांगतात. त्यामुळेच आजारी पडल्यावर बड्या रुग्णालयात किंवा डॉक्‍टरांकडे जाण्यापेक्षा सातारकार यांच्याकडे ऍक्‍युपंक्‍चर उपचारपद्धती घेऊ; त्याने नक्कीच बरे होईल, असा विचार करून क्‍लिनिकमध्ये येणाऱ्या रुग्णांचा विश्‍वास दिवसेंदिवस वाढत आहे.

दुसरी डॉक्‍टरेट अमेरिकेतून
सध्या आजारासाठी लागणारी भरमसाठ औषधे, तपासण्या आणि महत्त्वाचे म्हणजे आर्थिक भार लक्षात घेता “आजार परवडला पण उपचार नको’ अशी रुग्णांची मानसिकता झाली आहे. ऍक्‍युपंक्‍चर पद्धतीने रुग्णांची नाडी पाहूनच उपचार ठरवले जातात. त्यामध्येच सुमिता सातारकर यांचे मोठे कौशल्य आहे. कोणत्या मणक्‍यात त्रास आहे, किडनी स्टोन किती मिलीमीटरचा आहे, हे नाडी परीक्षणातून सांगता येते. त्याबाबत काही रुग्णांनी खात्री करण्यासाठी सोनोग्राफी, एक्‍सरे करून घेतले. ज्यावेळी सांगितलेली माहिती बरोबर आल्यावर ते स्वत:हून क्‍लिनिकमध्ये येऊन प्रतिक्रिया देतात. अमेरिकेत ऍक्‍युपंक्‍चरचे शिक्षण घेणे अवघड आहे. अमेरिकेतून मान्यता मिळणे हे मानाचे समजले जाते. सातारकर यांनी दुसरी डॉक्‍टरेट अमेरिकेतून मिळवत या क्षेत्रात मानाचे स्थान मिळवले आहे.

…त्यासाठी चळवळ उभारावी लागली
ऍक्‍युपंक्‍चर या उपचारपद्धतीला 132 देशांमध्ये मान्यता आहे. मात्र, आपल्याच देशामध्ये या पद्धतीला मान्यता का नाही? या विचाराने शांत बसवत नव्हते. त्यासाठी सरकारचा पाठिंबा आवश्‍यक असून, डॉ. देबाशिष बक्षी आणि डॉ. रुमी बर्माजी यांच्या मदतीने ऍक्‍युपंक्‍चर असोसिएशनची स्थापना केली. या पद्धतीला मान्यता मिळावी, तरुण पिढीने या क्षेत्रात यावे, त्याची माहिती सर्वांपर्यंत पोहचावी यासाठी अनेक वर्षे लढा दिला. सरकार, संघटना, अधिकारी यांच्याकडून अनेक प्रश्‍न उपस्थित करण्यात आले.

वर्ल्ड ऑर्गनायझेशनला 48 आजारांची यादी दिली आहे, ते आजार ऍक्‍युपंक्‍चरने बरे होतात, हे सिद्ध करून दाखवले. त्यानंतर ऍक्‍युपंक्‍चरला कायद्याने मान्यता दिली आणि महाराष्ट्र ऍक्‍युपंक्‍चर कौन्सिलची स्थापना झाली आहे. महाराष्ट्रातील व त्यानंतर संपूर्ण भारतातील सर्वसामान्य जनतेला अतिशय रास्त दरात आरोग्यसेवा म्हणजेच त्यांच्या आजारांवर योग्य व स्वस्तात उपचार मिळवून देणे, या स्वप्नपूर्तीच्या दिशेनेही प्रत्यक्ष वाटचाल सुरू झाली आहे. यातून तरुणांना रोजगाराची संधी मिळत आहे. त्याचबरोबर समाजातील गांजलेल्यांची सेवा करण्याचा परमार्थाचा मार्गही त्यांच्यासमोर आहे. महाराष्ट्रात व पर्यायाने सर्व भारतवर्षात ऍक्‍युपंक्‍चर शास्त्राच्या प्रसार-प्रचारासाठी व अधिकाधिक उपयुक्त होण्यासाठी महाराष्ट्र ऍक्‍युपंक्‍चर कौन्सिल कटिबद्ध आहे. ऍक्‍युपंक्‍चर, ऍक्‍युप्रेशर व्यवसायाच्या कायदेशीर मार्गात नैतिकता राहील, याबद्दल कौन्सिल नेहमी आग्रही असणार आहे.

पुरस्काराने सन्मानित
इंटरनॅशनल एक्‍सलन्स ऍवॉर्ड
राष्ट्रीय ऍक्‍युपंक्‍चर रत्न, हैदराबाद
ऍक्‍युपंक्‍चर एक्‍सलन्स ऍवॉर्ड, बंगळुरू
मदर टेरेसा पुरस्कार, बंगळुरू
धन्वंतरी पुरस्कार, कोलकाता
एशिया एक्‍सलन्स ऍवॉर्ड, बॅंकॉक
जागतिक गुणवत्ता पुरस्कार, नवी दिल्ली
महात्मा गांधी सन्मान ऑफ लॉर्डस, लंडन

संकलन : सागर येवले (पत्रकार)

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.