मागील आठवड्यात नालको या सरकारी नवरत्न कंपनीनं आपल्या 38 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये मागील 38 वर्षांच्या इतिहासातील सर्वोच्च असा भरघोस 115 टक्के लाभांश जाहीर केला. त्या दिवशीच्या किमतीनुसार या लाभांशाचं उत्पन्न हे तब्बल 12.90 टक्के येतंय.
मुख्य व्यवस्थापकीय संचालक, तपनकुमार चंद यांनी सांगितल्यानुसार 2018-19 हे वर्ष सर्वच आघाड्यांवर नालकोसाठी अत्यंत फायद्याचे वर्ष ठरलं. मागील चार वर्षं, कंपनी ही जगात सर्वात कमी किमतीत ऍल्युमिनियम उत्पादन करणारी आणि 2018 मध्ये सर्वात कमी किमतीत बॉक्साइटची उत्पादक कंपनी राहिलीय. स्थानिक बाजारपेठेतील ऍल्युमिनियमचा हिस्सा हा मागील वर्षीच्या 21.1 टक्क्यांवरून वाढून 24.3 टक्के पोहोचलाय तर नफा हा मागील दहा वर्षांतील उच्चांकावर म्हणजेच 1732 कोटी रुपयांवर गेलाय जो गेल्या वर्षीपेक्षा 29 टक्क्यांनी वाढलेला आहे. सध्याच्या भावात याचा पीई हा 7.65 असून पुस्तकी किंमत 0.83 आहे. लाभांशप्रेमी गुंतवणूकदारांसाठी ही कंपनी नक्कीच उजवी वाटू शकते.