मुंबई – करोनाच्या संकटामध्ये लॉकडाऊन झालेली चित्रपटसृष्टी पुन्हा एकदा ‘रोल, कॅमेरा, ऍक्शन’साठी सज्ज झाली आहे. थांबलेल्या चित्रपट आणि मालिकांचे शूटिंग पुन्हा सुरू होत आहे. अश्यात आता कलर्स मराठी वाहिनी प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी एक नवीन मालिका घेऊन येत आहे.
“ऑनलाइन लग्नाची सुपरफाइन गोष्ट- शुभमंगल ऑनलाईन’ असं या मालिकेचं शीर्षक आहे. या मालिकेच्या माध्यमातून एक भन्नाट कथा प्रेक्षकांना अनुभवायचा मिळणार असल्याचं दिसून येत आहे. सध्या मालिकेचा टिझर सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालत आहे.
‘ऑनलाइन लग्नाची सुपरफाइन गोष्ट- शुभमंगल ऑनलाईन’ या मालिकेतून एका लग्नाची हटके गोष्ट उलगडली जाणार आहे. लग्नसराई, मानपान, लग्नाची धामधूम, आनंद, खरेदीची लगबग हे सारं काही घरबसल्या या मालिकेतून प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे.
दरम्यान, ‘ऑनलाइन लग्नाची सुपरफाइन गोष्ट- शुभमंगल ऑनलाईन’ मालिकेत अभिनेत्री सायली संजीव आणि सुयश टिळक मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. त्यामुळे आता ही जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरती का नाही? हे पाहणे मजेशीर ठरणार आहे. येत्या 28 सप्टेंबरला ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.