रेल्वे ट्रॅक डागडुजीही सुपरफास्ट

– कल्याणी फडके

पुणे – पावसामुळे वाहून गेलेल्या रेल्वे पुलाचा भराव पूर्ववत करणे हे रेल्वे प्रशासनासमोर मोठे आव्हान होते. हा मार्ग बंद झाल्याने पुणे-मुंबई रेल्वेसेवा सातत्याने खंडित होत आहे. पण, आता हे काम अत्यंत वेगाने सुरू असून, धोकदायक दरडीदेखील हटवल्या जात आहेत. त्यामुळे येत्या काळात रेल्वे समोरील आव्हाने कमी होण्याची चिन्हे आहेत.

सध्या पुणे-मुंबई रेल्वे मार्गावर लोखंडी गर्डर बसवून, सिमेंटचा भराव टाकण्याचे काम सुरू आहे. यासह पीअर बांधणी, मायक्रो पायलिंग, फॅब्रिकेशन आदी कामे अंतिम टप्प्यात आहेत. यासाठी आवश्‍यक यंत्रे, जेसीबी, क्रेनसारखी वाहने, गर्डर, सिमेंट आदी साहित्य विशेष रेल्वेद्वारे आणले जाते. पुलासाठीचे गर्डर मनमाड येथील इंजिनिअरिंग वर्कशॉप येथे रेल्वेचे कर्मचारी तयार करतात. त्यानंतर ते तुकड्या-तुकड्यात कामाच्या ठिकाणी आणले जातात. तुकडे जोडून कामगार गर्डर तयार करतात.

दरडी पाडण्याचे काम
अतिवृष्टीमुळे रेल्वे मार्गाशेजारील डोंगरावरुन दरड कोसळण्याच्या घटना घडतात. या पार्श्‍वभूमीवर धोकादायक दरडींची पाहणी करण्यात येत आहे. सुमारे 1500 फूट डोंगरावर 15 जणांची “हिल गॅंग’ काम करते. डोंगराची पाहणी करुन पोकळ झालेले धोकादायक दगड खाली पाडण्यात येत आहेत. हे काम पूर्ण झाल्यानंतर दगड पुन्हा कोसळू नयेत, यासाठी उपाययोजना करण्यात येणार आहेत.

मागील काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने पूल दुरुस्ती युद्धपातळीवर सुरू आहे. पुन्हा मुसळधार पाऊस झाल्यास मार्ग खचू नये, यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन दुरुस्ती केली जात आहे. या कामासाठी आयआयटी आणि रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विशेष अभ्यास केला आहे.
– शिवाजी सुतार, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे.

असा आहे बोरघाट परिसर
बोगद्यांची संख्या 52
प्रमुख पूल 8
दैनंदिन धावणाऱ्या एक्‍स्प्रेस, पॅसेंजर 74
स्टेशन्सची संख्या 8

Leave A Reply

Your email address will not be published.