मनिला, (फिलीपाईन्स) – फिलीपाईन्सला आज गनी या चक्रिवादळाने जोरदार तडाखा दिला. या वादळामुळे किमान 7 जण ठार झाले आहेत. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे आणि मायोन ज्वालामुखीच्या मुखातून बाहेर पडणारी माती आणि भूस्खलनामुळे डोंगर उतारावरून आलेल्या चिखलाच्या ढिगाऱ्याखाली अनेक घरे गाडली गेली आहेत. या वादळामुळे राजधानी मनिलाचा मुख्य विमानतळही बंद करण्यात आला आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
फिलीपाईन्समधील कॅटान्डुसेन या प्रांताला आज पहाटे गनी चक्रिवादळाचा फटका बसला. त्यावेळी वाऱ्याचा वेग ताशी 225 किलोमीटर इतका होता. राजधानी मनिलासह अतिशय दाट लोकवस्तीच्या दिशेने हे वादळ सरकले. वादळामुळे मुसळधार पावसानेही फिलीपाईन्सच्या किनाऱ्याच्या भागाला झोडपले. आठवड्याभरापूर्वीच फिलीपाईन्सला बसलेल्या वादळाच्या तडाख्यात किमान 22 जण ठार झाले होते. त्यातून सावरत असतानाच या दुसऱ्या वादळाचा तडाखा फिलीपाईन्सला बसला आहे.
आजच्या वादळामध्ये अल्बाय प्रांतात किमान चौघेजण ठार झाले. चिखलाचे लोंढे गावाच्या दिशेने सरकू लागल्यामुळे सुरक्षिततेसाठी गावकऱ्यांनी गाव सोडून जवळच्या अन्य ठिकाणी आश्रय घेतला होता. मात्र जे गावकरी मागे राहिले होते, त्यापैकी काही जण चिखलाखाली गाडले गेले. काही जण झाडे पडल्याने मरण पावले असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
रविवारी दुपारनंतर वादळाचा जोर ओसरला असला, तरी भूस्खलनाची भीती कायम आहे. वादळादरम्यान समुद्रात 5 मीटर उंचीपर्यंत लाटा उसळत होत्या. त्यामुले समुद्राचे पाणी किनाऱ्याच्या गावातही घुसले आहे.
गोनी वादळामुळे फिलीपाईन्समधील आतापर्यंतच्या सर्वात भीषण हयान चक्रिवादळाच्या स्मृती ताज्या केल्या आहेत. 2013 च्या नोव्हेंबर महिन्यात आलेल्या हयान चक्रिवादळामुळे किमान 7,300 जण ठार झाले होते आणि अनेक गावे पूर्णपणे वाहून गेली होती. या वादळामुळे मध्य फिलीकिमान 50 लाख जणांवर विस्थापित होण्याची वेळ आली होती.