दोन हजार “सुपर स्प्रेडर्स’ची करोना टेस्ट

अवघ्या पाच जणांना लागण : पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डातर्फे सर्वेक्षण अभियान

 

पुणे – पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डातर्फे 2 हजार “सुपर स्प्रेडर्स’ची करोना चाचणी करण्यात आली. त्यामध्ये अवघ्या पाच जणांना लागण झाल्याचे आढळून आले आहे. जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार, बोर्ड प्रशासनातर्फे गेले दोन आठवडे “सुपर स्प्रेडर्स’ सर्वेक्षण अभियान राबवण्यात आले.

जास्त नागरिकांच्या संपर्कात येणाऱ्या आणि अनावधानाने संसर्ग पसरवू शकणाऱ्या व्यक्‍तींना “सुपर स्प्रेडर्स’ म्हणतात. करोनाच्या संभाव्य दुसऱ्या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर, राज्याच्या आरोग्य विभागाने “सुपर स्प्रेडर्स’चे सर्वेक्षण करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

त्यानुसार, बोर्डातर्फे छोटे व्यावसायिक, घरगुती सेवा पुरवणारे व्यावसायिक, वाहतूकदार, हमाली, रंगकाम आणि बांधकाम क्षेत्रातील श्रमिक, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे कर्मचारी, गृहनिर्माण सोसायट्यांचे सुरक्षारक्षक, पोलीस, होमगार्ड, सरकारी आणि निमसरकारी कर्मचारी आदी गटांतील व्यक्‍तींची करोना चाचणी करण्यात आली. त्यासाठी बोर्डाच्या सरदार वल्लभभाई पटेल रुग्णालयातर्फे आठ पथके तयार करण्यात आली होती.

या मोहिमेत दोन हजार जणांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये आस्थापनाचालकासह तेथे कार्यरत कर्मचाऱ्यांच्याही चाचण्या करण्यात आल्या. मात्र, त्यामध्ये अवघ्या पाच जणांना करोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. लष्कर परिसरात करोनाच्या सक्रिय रुग्णांचे प्रमाणही कमी आहे. तरीही साथरोग नियंत्रणात ठेवण्यासाठी नववर्षात 1 जानेवारीपासून पुन्हा “सुपर स्प्रेडर्स’च्या तपासणी मोहीम राबवणार आहोत.

– डॉ. विद्याधर गायकवाड, निवासी वैद्यकीय अधिकारी, सरदार वल्लभभाई पटेल रुग्णालय

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.