पुणे – शहरात करोनाच्या बाधितांची संख्या लक्षणीय प्रमाणात घटत असली तरी डिसेंबर- जानेवारीत करोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता केंद्रीय आरोग्य विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे, महापालिकेकडून खबरदारीचा उपाय म्हणून दिवाळीनंतर तातडीने “सुपर स्प्रेडर’ मोहिम राबविण्यात येणार असून यामध्ये
शहरातील व्यावसायिक, व्यापारी तसेच हॉटेल आणि रेस्टॉरंटच्या कर्मचाऱ्यांचा समावेश असणार आहे. त्यामुळे वेळीच या सर्वांची तपासणी झाल्यास त्यांच्याकडून होणारा करोनाचा प्रसार रोखण्यास मदत होणार आहे.
शहरात तब्बल आठ महिन्यानंतर करोनाची साथ ओसरण्यास सुरूवात झाली असून सक्रीय बाधित रुग्णांचा आकडा 6 हजारांच्या खाली आला आहे. त्यामुळे महापालिकेसह शहरातील आरोग्य यंत्रणेस मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र, त्याच वेळी मंदिरे आणि शाळा वगळता जवळपास सर्वच बाबी लॉकडाऊन नंतर पुन्हा सुरू झाल्याने शहरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात गर्दी वाढली आहे. परिणामी, दिवाळीनंतर पुन्हा रुग्णसंख्या वाढून करोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता आहे.