सुपर सिक्‍स पुन्हा मैदानात

मुंबई: भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर बरोबरच जागतिक क्रिकेटमधील सुपर सिक्‍स गणले जाणारे क्रिकेटपटू पुन्हा एकदा मैदानात उतरणार आहेत. वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार ब्रायन लारा आणि श्रीलंकेचा माजी फिरकीपटू मुथय्या मुरलीधरन, तिलकरत्ने दिलशान, जॉन्टी ऱ्होड्‌स, वीरेंद्र सेहवाग यांच्यासोबत टी-20 च्या मैदानात उतरणार आहे. आगामी वर्षात रस्ते सुरक्षाविषयक जागतिक स्पर्धेत सचिन दिग्गज खेळाडूंसह मैदानात उतरेल.

या स्पर्धेत भारतासह ऑस्ट्रेलिया, द. आफ्रिका, श्रीलंका आणि वेस्ट इंडिज या संघाचे हे माजी खेळाडू पुन्हा एकदा खेळताना दिसतील. भारतात पुढील वर्षी 2 ते 16 फेब्रुवारीदरम्यान ही स्पर्धा
होणार आहे.

गांगुली चांगले बदल करेल – सचिन
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी माजी कर्णधार सौरव गांगुलीची नियुक्‍ती होत आहे ही आनंदाची गोष्ट आहे. तो ही जबाबदारी समर्थपणे सांभाळेल असा मला विश्‍वास आहे. त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेटची निश्‍चितच प्रगती होईल तसेच तो देशातील क्रिकेटच्या यशासाठी चांगले काम करेल, असे सचिन तेंडुलकरने म्हटले आहे.

लाराकडून भारतीय गोलंदाजांची प्रशंसा –                                                                                वेस्ट इंडिजचा महान फलंदाज ब्रायन लारा याने भारतीय संघाच्या सध्याच्या गोलंदाजांनी मुक्‍त कंठाने प्रशंसा केली आहे.
सध्याची भारतीय संघाची वेगवान गोलंदाजी पाहताना मला वेस्ट इंडिजच्या 1980-1990 च्या काळातील वेगवान गोलंदाजीच्या तोफखान्याची आठवण येते असे गौरवोद्‌गार लाराने काढले आहेत. जसप्रीत बुमराह, महंमद शमी, भुवनेश्‍वर कुमार, इशात शर्मा आणि उमेश यादव हे वेगवान गोलंदाज भारतीय गोलंदाजीची धुरा समर्थपणे सांभाळत आहेत तसेच त्यांचे सातत्य देखील कौतुकास्पद आहे, असेही लारा म्हणाला. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली तर आजच्या घडीला जागतिक क्रिकेटमधील

सर्वोत्तम कर्णधार आहे, तो महान फलंदाज तर आहेच पण त्यापेक्षाही जास्त तो एक प्रगल्भ खेळाडूदेखील आहे. माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने जो भारतीय क्रिकेटच्या प्रगतीचा पाया रचला त्यावर कोहलीने कळस चढविला आहे. भारतीय संघ योग्य प्रगतीपथावर आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.