चाकणमधून सुपारीकिंग गजाआड

घोडेकर खुनी हल्ल्यातील आरोपींना बेड्या : दुसरा सूत्रधार फरारच

नारायणगाव  -कोल्हे मळा चौकात संग्राम घोडेकर यांच्यावर झालेल्या खुनी हल्ल्यातील आरोपींना गजाआड करण्यात नारायणगाव (ता. जुन्नर) पोलिसांना सोमवारी (दि. 11) यश आले. यात सुपारी किंगचा समावेश असून त्याला चाकणमधून अटक केली आहे. तर दुसरा सूत्रधार अद्यापही फरारच आहे. तर प्रमुख सूत्रधार येरवडा कारागृहात शिक्षा भोगत असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड यांनी दिली. 

सुपारी घेणारा कुविख्यात गुंड गणेश उर्फ गणी रामचंद्र नाणेकर (रा. नाणेकरवाडी, चाकण), अजय उर्फ सोन्या राठोड (वय 23, रा. 14 नंबर, ता. जुन्नर), खबऱ्या संदीप बाळशीराम पवार (वय 20, रा. पिंपळवंडी, ता. जुन्नर) व दोन अल्पवयीन हल्लेखोरांनी ताब्यात घेतले आहे. तर दुसरा सूत्रधार प्रशांत माने फरार आहे. प्रमुख सूत्रधार चंद्रशेखर निवृत्ती कोऱ्हाळे हा शिक्षा भोगत आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, गुरुवारी (दि. 7) संग्राम घोडेकर याच्यावर हल्ला करून फरार झालेले दोन अल्पवयीन गुन्हेगार व राठोड हा अलिबाग या ठिकाणी वास्तव्यास होते. 

या घटनेतील दुसरा सूत्रधार प्रशांत माने आणि सुपारी किंग गणेश नाणेकर या दोघांची पूर्वीची मैत्री होती. त्यांनी चंद्रशेखर कोऱ्हाळे यांच्याबरोबर डिसेंबर 2020 मध्ये या हल्ल्याबाबतची आखणी केली होती. याप्रकरणात अल्पवयीन मुलांचा वापर केल्यावर जामीन लवकर होऊन मुलांना सोडवता येईल म्हणून त्यांनी त्या घटनेत अल्पवयीन मुलांचा वापर करायचा ठरवले. त्यानुसार नाणेकरने सुपारी घेऊन ही जबाबदारी राठोडवर सोपवली. नाणेकरवर विविध पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे तर हल्लेखोर राठोडवर विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. 

घोडेकर यांच्यावर हल्ला करण्यापूर्वी संदीप पवार हा घोडेकर यांच्यावर पाळत ठेवून होता. पवारच्या माहितीवरून राठोडने दोन अल्पवयीन मुलांना बरोबर घेऊन घोडेकर यांच्यावर कोल्हेमळा येथे कोयत्यान हल्ला चढवल्याचे स्पष्ट झाले आहे. ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, उपविभागीय अधिकारी मंदार जवळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक दत्तात्रय गुंड, उपनिरीक्षक गुलाबराव हिंगे, पोलीस नाईक दिनेश साबळे, धनंजय पालवे, पो. कॉ. सचिन कोबल, शैलेश वाघमारे, शाम जायभाये, योगेश गारगोटे, पोलीस मित्र भरत मुठे यांच्या पथकाने केली केली.

नारायणगाव पोलिसांनी पाळला शब्द
नारायणगाव पोलिसांनी या घटनेनंतर मुख्य सूत्रधार चंद्रशेखर कोऱ्हाळेला अवघ्या सहा तासांच्या आत ताब्यात घेतले. तर पुढील गुन्हेगार लवकरच शोधून काढून असा शब्द सहायक निरीक्षक दत्तात्रय गुंड यांनी दिला होता त्यानुसार तीन दिवसांच्या आत यातील हल्लेखोर व सुपारी घेणाऱ्यास ताब्यात घेऊन पोलिसांनी आपला शब्द पाळला असल्याने नागरिकांनी त्यांचे कौतुक केले आहे.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.