अमिरातीत सुरू असलेल्या आयपीएल स्पर्धेतील काही खेळाडूंचा संघर्ष ऐकला की त्यांच्याबद्दल अभिमान वाटू लागतो. सनरायझर्स हैदराबादचा नवोदित खेळाडू प्रियम गर्गही असाच परिस्थितीशी झगडा करून नावारूपाला आलेला खेळाडू.
वडील नरेश गर्ग स्कूल व्हॅन चालवतात. घरात आर्थिक तंगी तर पाचवीलाच पुजलेली. मात्र, मुलाच्या स्वप्नांची पूर्ती करण्यासाठी वडिलांनीच पुढाकार घेतला. हे उदाहरण क्रीडाक्षेत्रात अनेक पालकांच्या डोळ्यात अंजन घालण्यासाठी पुरेसे आहे. जर घरातूनच पाठिंबा मिळाला तर कोणत्याही खेळाडूला इतर कोणाकडे हात पसरण्याची वेळ येणार नाही व ड्रॉप आऊटचे प्रमाण वाढणार नाही.
प्रियमचे कुटुंब मोठे आहे. त्याच्यासह एकूण पाच भाऊ व बहिणी आहेत. उत्तर प्रदेशमधील मेरठजवळच्या परिक्षितगडचा रहिवासी असलेला प्रियम शालेय शिक्षणाबरोबरच रोज सहा तास क्रिकेटच्या शिबिरात सराव करत असे. तो केवळ 11 वर्षांचा असताना त्याचे मातृछत्र हरपले. त्यानंतर नरेश यांनीच आई व वडील या दोन्ही भूमिका यथोचित सांभाळल्या.
2011 साली त्याच्या आईचे निधन झाले. मात्र, प्रियमने सचिन तेंडुलकरसारखे क्रिकेटपटू व्हावे हे या माऊलीचेच स्वप्न पूर्ण करण्याचा ध्यास त्याने घेतला व आज ते स्वप्न पूर्ण झाले. आयपीएल का होईना; पण जागतिक क्रिकेटमधील सर्वात मोठ्या व्यासपीठावर आज प्रियम खेळत आहे. आकाशातून त्या माऊलीचे डोळेही पाणावत असतील.
दोन वर्षांपूर्वी प्रियमला त्याच्या मेहनतीचे फळ मिळाले. त्याचा समावेश स्थानिक स्पर्धांमध्ये सातत्यपूर्ण झाल्यामुळे उत्तर प्रदेशच्या रणजी संघात झाला व तेथूनच त्याच्या सर्वसामान्य खेळाडू ते आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू असा प्रवास सुरू झाला. या स्पर्धेतही त्याने चमक दाखवली व त्याच्यासाठी 19 वर्षांखालील भारताच्या विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेच्या संघाचे कवाड खुले झाले. त्याला केवळ संघात स्थान मिळाले नाही तर त्या स्पर्धेसाठी त्याच्याकडेच नेतृत्वही सोपविण्यात आले होते. वयाच्या सहाव्या वर्षी क्रिकेटची गोडी लागलेल्या प्रियमला प्रशिक्षण शिबिरात जाण्यासाठी त्याच्या वडिलांनीच प्रोत्साहन दिले.
प्रियमला जेव्हा विश्वकरंडक स्पर्धेसाठी कर्णधार बनवले गेले तेव्हा अनेक जाणकारांच्या भुवया उंचावल्या होत्या. मात्र, या खेळाडूकडे अफाट गुणवत्ता आहे हे आयपीएल स्पर्धेतही आता सिद्ध होत आहे. त्याने महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या सामन्यात 26 चेंडूत केलेली 51 धावांची अर्धशतकी खेळी त्याच्या गुणवत्तेचीच साक्ष देते.
देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेत सर्वोच्च समजल्या जात असलेल्या रणजी स्पर्धेत उत्तर प्रदेशकडून खेळताना त्याने 2018-19 या मोसमात 800 पेक्षाही जास्त धावा केल्या. त्याने गोवा संघाविरुद्ध पहिलाच रणजी सामना खेळताना शानदार शतकी खेळी केली आहे. त्याला रणजी स्पर्धेतील तसेच देशांतर्गत अन्य स्पर्धेतील कामगिरीनंतर हैदराबाद संघाने जवळपास दोन कोटी रुपयांना आपल्या संघात घेतले यातच त्याची गुणवत्ताही सिद्ध होते. याच स्पर्धेत त्रिपूरासंघाविरुद्धच्या सामन्यात त्याने द्विशतकी खेळी केली. या संपूर्ण मोसमात प्रियमने जवळपास 68 च्या सरासरीने या धावा करताना दोन शतके व चार अर्धशतके फटकावली.
गेल्या वर्षी झालेल्या 19 वर्षांखालील विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत प्रियमच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने अंतिम फेरीत प्रवेश केला होता. गेल्या वर्षी त्याने सय्यद मुश्ताक अली स्पर्धेतही पदार्पण केले. त्यातील कामगिरीवरूनच त्याला देवधर, विजय हजारे या मानाच्या स्पर्धेतही खेळायला मिळाले व त्याला स्थानिक स्पर्धांचा मोठा अनुभवही मिळाला. आज तो वयाच्या विशीत आहे, समोर मोठी कारकीर्द आहे व त्याचा प्रवासही वेगाने व अत्यंत चांगल्या पद्धतीने सुरू आहे.