दुबई – निकोलस पुरनने केलेल्या वादळी 77 धावांच्या खेळीनंतरही सनरायझर्स हैदराबादने किंग्ज इलेव्हन पंजाबचा 69 धावांनी पराभव केला.
विजयासाठी 202 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या पंजाबचा डाव 16.5 षटकांत सर्वबाद 132 धावांवर रोखला गेला. हैदराबादच्या रशीद खानने 3, टी. नटराजन व खलील अहमद यांनी प्रत्येकी 2 गडी बाद करत पंजाबच्या फलंदाजीची वाताहत केली.
तत्पूर्वी, जॉनी बेअरस्टो व डेव्हिड वॉर्नर यांच्या वादळी फलंदाजीच्या जोरावर सनरायझर्स हैदराबादने किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्धच्या सामन्यात 6 गडी गमावून 201 धावा केल्या. नाणेफेक जिंकून कर्णधार वॉर्नरने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्याने बेअरस्टोच्या साथीत संघाला 160 धावांची यंदाच्या स्पर्धेतील दुसऱ्या क्रमांकाची सलामी दिली.
वॉर्नरपेक्षा बेअरस्टो जास्त आक्रमक होता. त्याने चौफेर फटकेबाजी करत पंजाबच्या गोलंदाजांवर वर्चस्व गाजवले. संघाच्या 160 धावा असताना वॉर्नर बाद झाला. त्याने 40 चेंडूत 5 चौकार व 1 षटकार फटकावत 52 धावांची खेळी केली. त्याला फिरकी गोलंदाज रवी बिष्णोईने बाद केले. बिष्णोईच्या याच षटकात चौथ्या चेंडूवर शतकाकडे वाटचाल करत असलेला बेअरस्टोही बाद झाला. चेंडू तटवण्याच्या प्रयत्नात तो पायचित झाला. त्याने आपल्या 97 धावांच्या खेळीत 55 चेंडूंचा सामना करताना 7 चौकार व 6 षटकारांची बरसात केली. त्याचे शतक मात्र, तीन धावांनी हुकले. त्याच्या जागी आलेल्या मनीष पांडेने साफ निराशा केली.
काश्मीरचा खेळाडू असलेल्या अब्दुल समद याला फलंदाजीत बढती देण्यात आली. त्याच्या साथीला केन विल्यमसन खेळपट्टीवर आला. या दोघांनी वेगाने धावा जमवण्याचा प्रयत्न केला. मात्र, उंचावरून फटका मारण्याच्या प्रयत्नात समदही बाद झाला. त्यालाही बिष्णोईनेच बाद केले.
हैदराबादने एकवेळ बिनबाद 160 धावा केल्या होत्या. मात्र, त्यानंतर केवळ 21 धावांत त्यांनी 4 फलंदाज गमावले. केन विल्यमसनने अभिषेक शर्माच्या साथीत अखेरच्या दोन षटकांत आक्रमक फलंदाजी केल्याने हैदराबादला संघाच्या द्विशतकी धावा फलकावर लावता आल्या.
पंजाबच्या शेल्डन कोट्रेल, महंमद शमी व ग्लेन मॅक्सवेल अत्यंत महागडे गोलंदाज ठरले. बेअरस्टो व वॉर्नर यांना बाद करणारा बिष्णोईदेखील महागडा ठरला. पंजाबने क्षेत्ररक्षणातही सुमार कामगिरी केल्याने हैदराबादच्या फलंदाजांना वेगाने धावा जमवणे सोपे ठरले.
संक्षिप्त धावफलक
सनरायझर्स हैदराबाद – 20 षटकांत 6 बाद 201 धावा. (जॉनी बेअरस्टो 97, डेव्हिड वॉर्नर 52, केन विल्यमसन नाबाद 20, अभिषेक शर्मा 12, रवी बिष्णोई 3-29, अर्शदीप सिंग 2-33). किंग्ज इलेव्हन पंजाब – 16.5 षटकांत सर्वबाद 132 धावा. (निकोलस पुरन 77, रशीद खान 3-12, टी. नटराजन 2-24, खलील अहमद 2-24).