मुंबई – अभिनेता आणि खासदार सनी देओल सध्या विदेशात आहे. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत देखील सनी देओल यांनी मतदान केले नव्हते. काही आठवड्यांपूर्वी सनी देओल यांचा चित्रपट शूटिंगच्या दरम्यान अपघात झाला होता आणि त्यांच्या पाठीला दुखापत देखील झाली होती. त्यामुळे काही दिवस त्यांच्यावर मुंबईत उपचार सुरु होते.
मुंबईतील उपचारानंतर डॉक्टरांनी सनी देओल यांना विदेशात जाऊन उपचार घेण्याचा सल्ला दिला होता त्यानंतर देओल यांनी विदेशात उपचार करायला सुरुवात केली आणि ते रुग्णालयात भरती झाले होते. यामुळेच देओल यांना राष्ट्रपतींच्या निवडणुकीत मतदान करता आले नाही. सध्या त्यांच्यावर विदेशातच उपचार सुरु आहेत. बर झाल्यानंतरच ते मायदेशी परतणार असल्याचे समजते.
या प्रोजेक्टवर करत आहे काम
सनी देओल आर बाल्कीच्या ‘चूप’मध्ये दिसणार आहे. याशिवाय सनी ‘गदर 2’ आणि ‘अपने 2’ मध्येही दिसणार आहे. मल्याळम क्राईम थ्रिलर ‘जोसेफ’चा रिमेक असलेल्या ‘सुरिया’साठीही तो शूटिंग करत आहे. यावर्षी एप्रिलमध्ये त्याचा लूक समोर आला होता. या चित्रपटात तो खूप मोठ्या आणि पूर्ण दाढीमध्ये दिसणार आहे.