ज्येष्ठ बॉलीवूड अभिनेते व भारतीय जनता पक्षाचे नेते धर्मेंद्र यांनी आज पंजाब येथील गुरुदासपूर येथून निवडणूक लढवणारे त्यांचे पुत्र व अभिनेते सनी देवल यांच्या निवडणूक उमेदवारीबाबत खुलासा केला आहे. एका वृत्तसंस्थेशी बोलताना धर्मेंद्र यांनी सांगितले की, “जर मला अगोदर माहीत असते की सनी विरोधात सुनील जाकर निवडणूक लढवणार आहेत तर मी सनीला निवडणूक लढवू दिली नसती. सुनील जाकर यांचे वडील बळीराम जाकर हे माझ्या बंधू प्रमाणे होते तसेच सुनील सोबत देखील माझे चांगले संबंध आहेत.”
यावेळी बोलताना धर्मेंद्र यांनी काँग्रेसचे गुरुदासपूर येथील लोकसभा उमेदवार सुनील जाकर यांच्या बाबत गौरवोद्गार काढताना, “सुनील जाकर हे एक मुरलेले राजकारणी असून त्यांचे वडील बळीराम हे देखील एक चांगले राजकारणी होते. आम्ही बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीमधून आल्यामुळे आम्हाला सुनील जाकर यांच्याप्रमाणे राजकीय भाषण बाजी करता येत नाही परंतु मातीशी नाळ जोडलेली असल्यामुळे आम्हाला येथील लोकांच्या समस्या मात्र चांगल्याने समजतात.” असं वक्तव्य केलं.