वीजपुरवठा खंडित झाल्याने अंगाची लाही: रस्त्यांवर शुकशुकाट
सातारा – साताऱ्यात मंगळवारी उन्हाचा पारा तब्बल 37 अंशावर पोहचला. त्यामुळे नागरिक उकाड्याने चांगलेच हैराण झाले. त्यातच मंगळवारी दिवसभर वीज पुरवठा खंडीत झाल्यामुळे नागरिकांच्या अंगाची लाही झाली. तसेच वाढत्या तापमानामुळे रस्त्यांवर शुकशुकाट निर्माण झाला होता. तज्ञांच्या मते आणखी दिवस तरी तापमानाचा पारा सरासरी 32 अंशाच्या आसपास राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी प्रकृतीची काळजी घेण्याच्या दृष्टीने सतर्क राहणे आवश्यक आहे.
मंगळवारचा दिवस सातारकरांच्या लक्षात राहिल असा ठरला. तापमानाचा पारा चांगलाच वाढल्यामुळे नागरिक घामाघुम होताना दिसून आले. त्यात दर मंगळवारी थोड्या कालावधी करिता वीजपुरवठा खंडित केला जातो. मात्र, यंदा पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर उपकरण दुरुस्ती व झाडांच्या फांद्या तोडण्यासाठी दिवसभर वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. त्यामुळे संपूर्ण दिवस फॅन व कुलर शिवाय काढण्याची वेळ सातारकरांवर आली.
काही नागरिकांनी घरासमोरील तसेच परिसरातील झाडाखाली विश्रांती घेण्याचा पर्याय निवडला. तर लहान मुलांनी परिसरातील विहीर, नाले व स्विमिंग टॅंकमध्ये पोहण्याचा आनंद लुटला. दुसऱ्या बाजूला उन्हाच्या तडाख्यामुळे दुपारच्या वेळेत रस्त्यांवर शुकशुकाट निर्माण झाला होता. बाजारपेठ आणि एस.टी.स्टॅंड परिसरात देखील नागरिकांची वर्दळ कमी झाली होती. त्याचबरोबर मैदानावरील आयोजित क्रिकेट सामने दुपारच्या वेळेत स्थगित करण्यात आले होते.