Sunil Tatkare on Uttamrao Jankar: राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे माळशिरसचे आमदार उत्तमराव जानकर यांनी ईव्हीएमच्या मुद्यावर पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. जानकर यांनी दिल्लीत निवडणूक आयोगाकडे राजीनामा देणार असल्याचे म्हटले आहे. तसेच, माळशिरस विधानसभा मतदारसंघात बॅलेट पेपरवर पोटनिवडणूक घेण्याची विनंती करणार असून, ही मागणी मान्य न झाल्यास दिल्लीतील जंतरमंतरवर आंदोलन करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे दिला, तरच तो खरा राजीनामा असतो. राजीनामा दिला तर त्या जागेवर महायुतीचा उमेदवार निवडून येईल, असे म्हणत सुनील तटकरे यांनी उत्तमराव जानकर यांच्यावर निशाणा साधला आहे.
जानकर यांच्या ईव्हीएमच्या मुद्यावर आमदारकीचा राजीनामा व दिल्लीतील आंदोलन करण्याच्या निर्णयावर बोलताना सुनील तटकरे म्हणाले की, विधानसभा सदस्य, विधानपरिषद सदस्य, राज्यसभा सदस्य, लोकसभा सदस्य यांना त्यांचा राजीनामा द्यायचा असेल तर त्या-त्या सभागृहांच्या अध्यक्षांकडे द्यावा लागतो. तरच तो खरा राजीनामा असतो. ही केवळ स्टंटबाजी आहे, असा टोला त्यांनी लगावला.
दिखाव्यासाठी किंवा प्रसिद्धीसाठी आणि नैराश्यासाठी तयार केलेले हे फेक नरेटिव्ह आहेत. त्याचाच हा एक भाग आहे. बाकी काही नाही. ते राजीनाम्याची करत असल्याची भाषा ही निव्वळ स्टंटबाजी आहे. त्यांनी राजीनामा दिल्यास त्या ठिकाणी महायुतीचा उमेदवार निवडून येईल. ते ज्या यंत्रणेकडे राजीनामा देण्याची भाषा करत आहेत, त्या यंत्रणेचा राजीनामा स्वीकारण्याबाबत रोलच नाही, असे तटकरे म्हणाले.
दरम्यान, आमदार उत्तमराव जानकर यांच्याकडून सातत्याने ईव्हीएमवर शंका उपस्थित केली जात आहे. या मुद्द्यावर आता थेट निवडणूक आयोगाकडेही जाणार आहेत. ते 23 जानेवारीला दिल्लीत मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट घेणार आहेत. ते माळशिरस विधानसभा मतदारसंघात बॅलेट पेपरवर पोटनिवडणूक घेण्याची विनंतीही निवडणूक आयोगाकडे करणार आहेत. तसेच, ही मागणी मान्य न झाल्यास दिल्लीतील जंतरमंतरवर आंदोलन करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.