वडगाव मावळ, दि. 22 (प्रतिनिधी)- गेल्या काही दिवसांत एकमेकांना अडचणीत आणण्यासाठी मावळचे आजी -माजी आमदार प्रयत्न करताना दिसले. मात्र, विकासाचा मुद्दा घेत, या दोघांनीही मंगळवारी (दि.21) ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांची स्वतंत्रपणे भेट घेतली. या दोघांनीही मावळच्या विकासाची स्वतंत्र भूमिका मांडली.
पावसामुळे मावळ तालुक्यातील ग्रामीण भागांतील अनेक रस्त्यांची दुरवस्था झालेली असून सत्ता पालटानंतर सरकारने मावळातील अनेक विकास कामांवर स्थगिती घेतली असून त्यात रस्त्यांच्या कामांचा देखील समावेश आहे. रस्त्याच्या कमांवरील स्थगितीमुळे खराब रस्त्यावरून नागरिकांना प्रवास करावा लागतो आहे. यामुळे मावळातील मंजूर झालेल्या रस्त्याच्या कामांवरील स्थगिती उठवावी. तसेच अत्यंत दुरवस्था झालेल्या रस्त्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी आमदार सुनिल शेळके यांनी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे केली आहे.
दरम्यान, माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी देखील बुधवारी (दि.21) ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांची मंत्रालयात भेट घेऊन त्यांच्याकडे नानोली तर्फे चाकण ते इंदोरी रस्त्याचे डांबरीकरण व रुंदीकरण , ग्रामपंचयत कार्यालय, स्मशनभूमी, सामाजिक सभागृह, अंतर्गत रस्ते, व्यायामशाळा आदी सुमारे 2 कोटी 75 लक्ष रुपयांच्या विकास कामांना विशेष बाब म्हणून मंजुरी देण्यात यावी, अशी मागणी केली आहे. या मागण्यांचे स्वतंत्र निवेदन महाजन यांना सादर केले आहे.
ही निवेदने स्विकारत मंत्री गिरीश महाजन यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. मात्र. नेमक्या कोणाच्या विकासकामांना प्राधान्य मिळेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.