पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार सुनिल कांबळे निवडणुकीच्या प्रचारात उतरले आहेत. मंगळवारी त्यांनी रास्ता पेठ आणि मंगळवार पेठ येथील ज्येष्ठ नागरिकांची भेट घेत त्यांच्यांशी मनमोकळा संवाद साधला.
यात पक्षाच्या काही माजी पदाधिकाऱ्यांचा समावेश होता. या पदाधिकाऱ्यांनी जुन्या निवडणुकांच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी कांबळे यांंनी महायुतीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत गेल्या पाच वर्षांत मतदारसंघात केलेली विकासकामे तसेच मतदारसंघातील पुढील नियोजनाची माहिती देण्यात आली. कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून सुनिल कांबळे यांना भाजपकडून दुसऱ्यांदा संधी देण्यात आली.
कांबळे यांनी सोमवारी शक्ती प्रदर्शन निवडणूक अर्ज भरला होता. त्यानंतर त्यांनी तत्काळ मतदारसंघात कामाला सुरूवात केली आहे. त्यासाठी मतदारसंघात ते संघटनेचे पदाधिकारी, ज्येष्ठ कार्यकर्ते, ज्येष्ठ नागरिक यांच्याशी संवाद साधत आहेत. भेटीगाठींमध्ये ज्येष्ठांचा प्रतिसाद मिळत असून मतदार संघासाठी आणखी काय करावे तसेच सर्वसामान्यांच्या शासनाकडून असलेल्या अपेक्षा याबाबत नागरिकांच्या सकारात्मक सूचना मिळत असून त्या सोडविण्यावर आपला भर राहणार असल्याचे कांबळे यांनी सांगितले.