नवी दिल्ली – राजस्थानातील उदयपूर येथे कॉंग्रेसचे तीन दिवसांचे चिंतन शिबीर सुरू असतानाच पराभवाचा सामना करावा लागलेल्या पंजाब या राज्यात कॉंग्रेसला मोठा हादरा बसला आहे. पंजाब कॉंग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते सुनील जाखर यांनी पक्षाला रामराम केला आहे. विशेष म्हणजे फेसबुक लाईव्हमध्ये त्यांनी गुडलक आणि गुडबाय असे म्हणत पक्ष सोडण्याची घोषणा केलीआहे.
काही दिवसांपूर्वीच सुनील जाखर यांच्यावर पक्षाने शिस्तभंगाची कारवाई करत दोन वर्षांसाठी पक्षातील सर्व पदांपासून दूर राहण्याचे निर्देश दिले होते. त्यामुळे आधीच पक्षावर नाराज असलेल्या जाखर यांनी अखेर आज फेसबुक लाईव्हमध्ये बोलताना पक्ष सोडत असल्याचे जाहीर केले.
मुख्यमंत्रीपदाची उमेदवारी न दिल्याबद्दल जाखर पक्षावर नाराज होते. निवडणुकीतील पराभवानंतर त्यांनी पराभवासाठी चरणजीतसिंग चन्नी यांनाच जबाबदार धरले होते. त्यानंतरच त्यांच्यावर कारवाई करण्यात आली होती. कॉंग्रेस पक्ष लांगुलचालन करणाऱ्यांनी घेरला गेला आहे. यामुळेच नुकसान होत आहे. या लोकांनी देशभर राजकारण करावे, पण पंजाबला सोडून द्या.
मला कॉंग्रेसच्या या परिस्थितीची कीव येते. हे चिंतन शिबीर फक्त एक औपचारिकता आहे. यातून फार काही हाती लागणार नाही अशी टिप्पणीही जाखर यांनी केली आहे.