पर्यावरण चळवळीतील प्रेरणादूत “सुनेत्रावहिनी’

एन्व्हायर्मेंटल फोरम ऑफ इंडियाच्या प्रणेत्या, पर्यावरणदूत सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांनी एक वेगळा ठसा उमटविला आहे. अभ्यासू नेतृत्व, दूरदृष्टी, तसेच वृक्षलागवडीसाठी झोकून देऊन काम करण्याची हातोटी, लोकसहभागातून पर्यावरणक्रांतीचा ध्यास, गावकुसातील लोकांसाठी जलसाक्षरता आदी उपक्रम राबवून राज्यात ठसा उमटविला आहे. रविवारी (दि.18) सुनेत्रावहिनी यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या पर्यावरण कार्याला मंगेश नाना मित्र परिवारचे अध्यक्ष मंगेश ओमासे यांनी दिलेला पर्यावरणपूरक उजाळा…

बारामतीचा लौकीक राज्यासह संपूर्ण देशात आहे. बारामती शहरात कोणी पाहुणचार केला तर बारामतीच्या प्रेमात पडल्याशिवाय राहत नाही. शहरात आल्यानंतर औद्योगिक, सहकार क्षेत्रातील पायाभूत सुविधांपासून तयार झालेला विकासरुपी डोंगर दिसतो. याचवेळी प्रत्येकांना भुरळ घातली जाते. ती पर्यावरणाची. शहरातील पर्यावरण हा राज्यात चर्चेचा विषय ठरला आहे.

कारण यामागे अथक परिश्रम आणि प्रेरणा देणाऱ्या प्रणेत्या आहेत सुनेत्रा वहिनी. त्यांच्या नावीन्यतेतून आणि ध्यासातून त्यांनी बारामती तालुक्‍यात पर्यावरण चळवळ उभी केली आहे. हा उपक्रम राबविताना त्यांनी लोकसहभाग महत्त्वाचा मानला. त्यातून एक अफाट काम बारामती शहरासह तालुक्‍यात उभे राहिले. त्यांच्या कामाची दखल घेत गावगाड्यातील अनेक नागरिक, महिला संघटित झाल्या. त्यामुळे शहरातील पर्यावरणबिंदू गावागावांत दिसू लागला.

सुनेत्रावहिनींनी एन्व्हायर्मेंटल फोरम ऑफ इंडियाची स्थापना करून दिशा दिली. कोणतीही चळवळ उभी करताना ध्येय, दूरदृष्टी, अंमलबजावणी आवश्‍यक असते. पर्यावरणासाठी झोकून देऊन काम करणाऱ्या तरूण, तरूणी, महिलांना संघटित केले. त्यांच्यामुळे आज बारामती शहरातील पर्यावरणाचा जागर सुरू आहे. शहरातील एमआयडीसीकडे जाणारा रस्ता, उद्यान, सायली हिल परिसर ही उदाहरणे राज्यासाठी रोल मॉडेल ठरली आहेत.

गेल्या बारा वर्षांत अथक प्रयत्न, चिकाटी, जिद्दीने पर्यावरणपूरक क्रांती त्यांनी निर्माण केली आहे. तरूणांना मार्गदर्शन, आवश्‍यक सुविधा पुरविणे, वृक्षलागवडीचा संकल्प, त्याचबरोबर संगोपन करणे आदी घटकांवर त्यांनी लक्ष केंद्रित केले. त्यामुळे बारामती शहर हरितमय झाले आहे. शहरात आलेल्या प्रत्येकांना याची प्रचिती आल्याशिवाय राहत नाही. पर्यावरण विश्‍वात विशेषत: राज्यात इतके मोठे काम कोणत्याही तालुक्‍यात आणि जिल्ह्यात झाले नाही.

कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना त्यांना भविष्यात गरज, महत्व आणि त्याची व्याप्ती, यावर मार्गदर्शन करून त्या प्रेरणा देत आहेत. बारामती तालुक्‍यासाठी पर्यावरण चळवळीतील त्या प्रेरणादूत ठरल्या आहेत. त्यामुळे हा सेतू अविरतपणे सुरू ठेवून त्यांनी कधीही खंडित होऊ दिला नाही. बारामती शहरासह तालुक्‍यात पर्यावरणासह जलसंवर्धनासाठी भरीव काम केले आहे.

गावगाड्यातील लोकांना आधार देत ओढे, नाल्याच्या खोलीकरणासाठी पिण्याचे पाणी, शेतीसाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी तसूभरही कमी पडल्या नाहीत. एन्व्हायर्मेंटल फोरम ऑफ इंडियाच्या अध्यक्षा सुनेत्रावहिनी शहरात काम करीत असताना मी त्यांच्या उपक्रमात सहभागी झालो. मंगेशनाना ओमासे मित्र परिवाराच्या माध्यमातून एक पर्यावरणचळवळ उभी करण्यासाठी त्यांनी दिशा दिली. वहिनी यांनी प्रेरणा दिल्यामुळेच सायली हिल परिसरात पर्यावरणपूरक उपक्रम राबविला. सायली हिल परिसरात एन्व्हायर्मेंटलच्या माध्यमातून उपक्रम राबवित आहे.

संपूर्ण मानवजातीसाठी निसर्गाने ओंजळ रिती केली आहे. या निसर्गाप्रती आपणही बांधिलकी जोपासली पाहिजे, या हेतूने पर्यावरणचळवळीत काम सुरू केले. पहिल्यांदा सायली हिल पसिरात स्वच्छतेचा लवलेशही नव्हता. त्यामुळे प्रथम तरूणांना एकत्रित करून श्रमदान शिबिर घेतले. यातून प्रत्येकांमध्ये समाजाप्रती आपुलकीची भावना निर्माण झाली. “स्वच्छ बारामती, सुंदर बारामती’चा ध्यास घेतला. एन्व्हायर्मेंटलच्या माध्यमातून मंगेशनाना मित्र परिवारकडून सलग 51 आठवडे श्रमदान शिबिरे आयोजित केली.

यातून परिसराचा कायापालट केला. वहिनींच्या मार्गदर्शनाखाली तसेच नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, ज्येष्ठ नगरसेवक किरणदादा गुजर, गटनेते सचिन सातव यांच्या उपस्थितीत मंगेशनाना मित्र परिवारकडून 251 वृक्षांचे रोपण करण्यात आले. फक्‍त वृक्षारोपणपुरते फोटोसेशन न करता त्याचे संगोपन करण्याची जबाबदारी लिलया पार पाडली आहे. आज सायली हिल परिसरातील हरितक्रांती दिसत आहे.

त्यामागे सुनेत्रा वहिनींचे योगदान आणि दूरदृष्टी आहे. सायली परिसरात प्रत्येक मार्गावर वृक्षसंपदा जोपासली. झाडांच्या माहितीसाठी माहितीफलक, सुशोभिकरण, मजबूतीकरण, रंगरंगोटी केल्यामुळे वृक्षसंवर्धनाचे फलित प्रत्यक्षात साकारले आहे. सामाजिक उपक्रम, रक्‍तदान शिबिर, आदी उपक्रमांतून प्रत्येकांना ऊर्जा देण्याचे काम वहिनींनी केले आहे. पर्यावरणातील जागरचा यज्ञ असाच निरंतर तेवत राहावा, यासाठी वहिनींना वाढदिवसानिमित्त त्यांना पर्यावरणपूरक शुभेच्छा.

– शब्दांकन : प्रमोद ठोंबरे, बारामती.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.