संडे: स्पेशल:पावकेश्‍वर मंदिर

अशोक सुतार
करहाटक म्हणजेच कऱ्हाड आणि आता कराड नगरीच्या भोवताली त्रयदशी ज्योतिर्लिंगांचा वास असून यातील बहुतांशी मंदिरे प्राचीन कालखंडातील आहेत. कराड शहरापासून हाकेच्या अंतरावर कृष्णा नदीच्या पैलतीरावर सैदापूर या गावात भव्य प्राचीन पावकेश्‍वर मंदिर आहे. पावकेश्‍वर मंदिराचे बांधकाम सुंदर असून शिखरावर अनेक देवदेवतांच्या सुबक मूर्ती कोरण्यात आल्या आहेत. मंदिराचा मंडप सात मुख्य तर दहा उपखांबांवर उभारला आहे. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला गणेश मूर्ती असून मंदिराच्या गाभाऱ्यात भव्य शिवपिंड आहे. शिल्पकलेचा उत्तम नमुना असलेले हे प्राचीन महादेवाचे मंदिर आहे. श्रावणातल्या शेवटच्या सोमवारी येथे यात्रा भरते.

पावक म्हणजे अग्नी होय. अग्नी स्वत:ला पवित्र ठेवतो. त्यामुळे भक्‍तांनी त्याची मनोभावे पूजा केल्यास त्यांची मन:शुद्धी करून भक्‍तांच्या श्रद्धेला पावणारा ईश्‍वर म्हणजे “पावकेश्‍वर’ अशी त्याची ख्याती आहे. हे मंदिर हेमाडपंथी धाटणीचे असून या मंदिराला चारही बाजूंनी 20 फुटांची तटबंदी आहे. पूर्वेला भव्य प्रवेशद्वार असून त्यासमोर उंच दीपमाळ उभी आहे. दरवाजासमोर नंदी असून त्यासमोर छोटेसे शिवलिंग, पादुका आणि दीप आहे. या नंदीवर पूर्वी मेघडंबरी असल्याच्या खुणाही पाहायला मिळतात. मंदिर परिसरात अनेक ठिकाणी दगडी चाके, काही दगडी खांबांचे अस्तित्व आहे. मंदिर आणि प्रवेशद्वार यामध्ये पूर्वी फरसबंदी मार्ग होता.

त्याचे अवशेष आता शिल्लक आहे. पावकेश्‍वर मंदिराचा कळस दगडी बांधकामाचा असून चुनखडीचा वापर करण्यात आला आहे. मंदिराच्या भोवती अनेक सुंदर मूर्तीं कोरलेल्या आहेत. तर खांबावर नाग, देवता, अष्टकमळ इ. अनेक प्रकारची सांकेतिक चिन्हे कोरली आहेत. आदिलशाही आणि शिवकाळात या मंदिराचा उपयोग शेतसारा गोळा करण्यासाठी, लष्करी छावणीसाठी वा एखाद्या सरदाराच्या वास्तव्यासाठी तर मळग्यांचा वापर वास्तव्य आणि घोडी बांधण्यासाठी केला जात असे. हे मंदिर पुरातत्व खात्याकडे वर्ग करण्याची गरज आहे. मंदिराला “क’ वर्ग पर्यटन क्षेत्राचा दर्जा देण्यात आला तर एक उत्तम पर्यटनस्थळ म्हणून नावारूपाला येईल.

सैदापूर गावाचे मूळ नाव संभापूर असून हे गाव छत्रपती शिवाजी महाराजांनी वसवले असल्याचा उल्लेख महाराष्ट्रातील एका प्रसिद्ध इतिहासकारांनी कराड येथील एका व्याख्यानात केला होता. शिवाय अफझलखान वधानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी पन्हाळगड मोहिमेवर जाताना कराड प्रांतातील किल्ले वसंतगड आणि पंताचा कोट काबीज करून येथील प्रीतिसंगमावर विजयी शस्त्रे धुतली असल्याचेही सांगितले जाते.

Leave A Reply

Your email address will not be published.