कान्हे, (वार्ताहर) – आषाढ महिन्याचा शेवटचा दिवस खवय्यांसाठी खास असतो. सोमवारपासून श्रावण सुरु होत आहे. त्यामुळे आखाडाचा शेवट आणि रविवार असा योग जुळून आल्याने मांसाहारावर ताव मारण्यासाठी खवय्यांनी सकाळपासूनच चिकन-मटणच्या दुकानांसमोर रांगा लावल्या होत्या. मावळ तालुक्यातही शहर, ग्रामीण अशा दोन्ही भागात रविवारी खवय्यांनी मांसाहाराचा मनसोक्त आस्वाद घेतला.
अनेकांनी आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी ‘गटारी अमावस्या’ साजरी करण्याचे नियोजन केले होते. त्यामुळे चिकन, मटण सोबत मच्छी खरेदीसाठी दुकानांबाहेर गर्दी झाली होती.
गटारी अमावस्या झाल्यानंतर सुरू होणाऱ्या श्रावण महिन्यात अनेकजण मांसाहार वर्ज्य करतात. त्यामुळे रविवारीच मनसोक्त ‘तिखट’ खाण्यासाठी खवय्यांनी हॉटेल, खाणावळी येथे गर्दी केली होती. तर पाऊस जास्त असल्याने अनेकांनी घरीच ‘गटारी’चे नियोजन केले होते.
गावरान कोंबड्यांनी खाल्ला ‘भाव’ –
मावळ तालुक्यात ग्रामीण भागामध्ये आखाड पार्टी आणि गटारीमुळे गावरान कोंबड्यांचे भाव गगनाला भिडले होते. आखाडाच्या शेवटच्या दिवशी अर्थात ‘गटारी’ला ग्रामीण भागात मांसाहारी भोजनाला विशेष पसंती दिली जाते.
त्यात बकऱ्याचे मटन किंवा गावरान कोंंबड्यांना खास मागणी असते. यात लाल तुरेवाला, बांग देणारा कोंबडा यांचे भाव रविवारी नेहमीपेक्षा अधिक होते. ४००-५०० रुपये भाव असणारे कोंबडे थेट ७००-८०० रुपये देऊन खरेदी करण्याची वेळ खवय्यांवर आली होती.