मुंबई – गेले दहा बारा दिवस महाराष्ट्रातील राजकारणात अनेक घडामोडी घडल्या. अनेक राजकीय पेचप्रसंग देखील तयार झाले. पण अखेर या सर्व नाट्यानंतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले आहे.
दरम्यान, महाराष्ट्राच्या राजकारणातील सक्रिय नेते ‘रोहित पवार’ यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवर काही खास फोटो शेअर केले असून, एक भावनिक पोस्ट सुद्धा लिहिली आहे. या पोस्टमधून त्यांच्यातील नेत्यासोबतच एका वडिलाच्या मनातील भावना दाटून आल्याचं स्पष्ट होत आहे.
“कालच्या अधिवेशनाचे कामकाज संपवून त्याच घडामोडींवर चर्चा करत मी आणि आमदार डॉ.विश्वजित कदम गाडीने एकत्र निघालो होतो, साहजिकच गप्पा राजकीय रंगल्या होत्या, अचानक रस्त्याच्या बाजूला एक खेळण्याचं दुकान दिसल्याबरोबर दोघांनाही त्या ठिकाणी जाण्याचा मोह आवरला नाही.
बाप म्हणून जेवढा वेळ आपल्या मुलांना दिला पाहिजे तेवढा देऊ शकत नाही त्यामुळे या क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येकानेच अशा छोट्या छोट्या प्रसंगातून नेहमीच आनंद शोधायचा प्रयत्न केला पाहिजे”. असं रोहित पवार यांनी लिहलं आहे.