लालुप्रसाद यांच्या पत्नीची पोलिसांकडे उलट तक्रार
नवी दिल्ली : राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांच्या घरातील सासु-सुनेचा कलह काही केल्या संपताना दिसत नाही. कारण सुन ऐश्वर्या राय यांच्यानंतर आता लालुंच्या पत्नी राबडी देवी यांनी सून ऐश्वर्या रायविरोधात उलट तक्रार दाखल केली आहे. ऐश्वर्यापासून माझ्या जीवाला धोका आहे, तसेच डिसेंबरला ऐश्वर्याने जीवघेणा हल्ला केला असे राबडीदेवींनी म्हटले आहे. यामुळे पुन्हा एकदा लालू प्रसाद यादव यांच्या घरातील गृहकलह चव्हाट्यावर आले आहेत.
रविवारी सून ऐश्वर्या रायनं सासू राबडी देवी तसेच अन्य कुटुंबीयांविरोधात गंभीर आरोप केले होते. राबडी देवी यांनी माझे केस ओढले आणि मला मारहाण केली. त्यानंतर निवासस्थानी नियुक्तीला असलेल्या सुरक्षारक्षकांनी मला बळजबरीने घराच्या बाहेर काढले. तसेच हुंड्यासाठी छळ केला जात असल्याचा आरोप ऐश्वर्याचा होता.
त्यानंतर लगेच राबडीदेवींनीही ऐर्श्वयाविरोधात तक्रार नोंदवली आहे. माझ्या जीवाला ऐश्वर्यापासून धोका आहे. तिने रविवारी माझ्यावर जीवघेणा हल्ला केला. मी त्यातून कशीबशी बाहेर पडले. ऐर्श्वर्याने मला शिवीगाळही केली तसेच खोट्या केसमध्ये अडकवण्याची धमकीही दिली असे राबडीदेवींनी म्हटले आहे.