16 व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवादरम्यान “सन राईज” आणि ‘शेवंती’ या लघुपटांना प्रेक्षकांची पसंती

“सन राईज”च्या दिग्दर्शिका विभा बक्षी आणि “शेवंती” चे दिग्दर्शक निलेश कुंजीर यांनी सांगितली, “पुरुष स्त्रीच्या मनात शिरतो त्याची गोष्ट…. “

माहितीपट, लघुपट आणि ऍनिमेशनपटांना समर्पित असलेल्या १६ व्या मुंबई आंतराराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात, आज दुसऱ्या दिवशी फिल्म डिव्हिजनच्या थियेटर मध्ये ‘सन राईज’ हा हिंदी-इंग्रजी माहितीपट आणि ‘शेवंती’ या मराठी लघुपटाचे प्रदर्शन झाले. हे दोन्ही चित्रपट राष्ट्रीय स्पर्धा विभागात निवडण्यात आले आहेत. त्यानंतर या दोन्ही चित्रपटांच्या निर्माते-दिग्दर्शकांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

‘सन राईज’ चित्रपटाच्या निर्मात्या-दिग्दर्शक विभा बक्षी यांनी या चित्रपटाच्या निर्मितीमागची भूमिका आणि चित्रीकरणाचे अनुभव सांगितले. २०१८ मध्ये तयार झालेल्या या चित्रपटाला नुकताच राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला आहे.

हरयाणा या राज्याच्या स्त्रियांच्या कौटुंबिक-सामाजिक स्थितीवर भेदक भाष्य करणाऱ्या या चित्रपटात सकारात्मक आशेचा किरण दाखवण्यात आला आहे. सामूहिक अत्याचारांचा बळी ठरलेल्या एका तरुण मुलीशी लग्न करण्याचा निर्णय एक युवक घेतो, आणि एवढंच करुन तो थांबत नाही, तर तिच्यावर झालेल्या अत्याचाराला वाचा फोडून तिला न्याय मिळवून देण्यासाठी तो तिच्यासोबत लढायला उभा ठाकतो. ‘तुझी लाज गेलेली नाही, तर या कृतीमुळे पुरुष जातीची लाज गेली आहे’, त्यामुळे तुझ्या बाजूने उभे राहणे माझेच कर्तव्य आहे, अशी भूमिका मांडणारा हा तरुण हरियाणासारख्या मागास राज्यातल्या परिवर्तनाचे प्रतीक आहे. विशेष म्हणजे, त्याचे पालक, त्याची आईदेखील या लढ्यात आपल्या मुलांच्या बाजूने उभी राहते. कुटुंबाचे विचार बदलले, तर समाज देखील बदलतो, हा संदेश देणारा हा चित्रपट आहे.’ लैंगिक भेदभाव आणि स्त्रियांना कस्पटासमान मानणारा समाज’ अशी प्रातिमा असलेल्या हरियाणा राज्यात हा परिवर्तनाचा संदेश विभा बक्षी यांनी प्रभावीपणे मांडला आहे. माहितीपटाच्या शीर्षकातला ‘सन’ Son म्हणजे मुलगा आहे. समाज बदलायचा असेल, तर पुरुषांनी बदलायला हवं, पुरुषार्थाच्या कल्पना बदलायला हव्यात, त्यासाठी पालक आपल्या मुलांना कसे घडवतात, हे मह्त्वाचे आहे, अशी भूमिका विभा बक्षी यांनी मांडली.

या माहितीपटाच्या चित्रीकरणाच्या आठवणी सांगताना त्या म्हणाल्या की, सुरुवातीला लोक माझ्याशी बोलायला तयार नव्हते, मात्र मी त्यांचा विश्वास संपादन केल्यावर त्यांनी माझ्याशी मनातलं बोलायला सुरुवात केली. आणि नंतर तर खाप पंचायतीच्या प्रमुखांनीच हा माहितीपट शाळाशाळांमध्ये दाखवायला पुढाकार घेतला. त्यामुळे, प्रयत्न केला तर परिवर्तन घडू शकते, यावर माझा विश्वास दृढ झाला, असे विभा बक्षी म्हणाल्या. हा विषय अत्यंत संवेदनशील असल्यामुळे, पुढेमागे संधी मिळाली तर यावर चित्रपट काढण्याचाही विचार असल्याचे त्यांनी सांगितले. आता पुरुषांनी स्त्रीचे मन, तिच्या व्यथा समजून घेत, तिच्यासाठी उभे राहण्याची गरज आहे, असा संदेश देणारा त्यांचा चित्रपट संयुक्त राष्ट्रांच्या “ही फॉर शी’(He For She) या स्त्री-पुरुष समानतेच्या मोहिमेशी सुसंगत आहे, असेही त्यांनी सांगितले.

स्त्री-पुरुषाचे हळुवार नाते आणि स्त्रीचे मन समजून घेण्याचा पुरुषाचा प्रयत्न हा विषय तरलपणे मांडणारा मराठी लघुपट “शेवंती” देखील या महोत्सवात आज दाखवण्यात आला. सुप्रसिद्ध लेखक, चारोळीकार चंद्रशेखर गोखले यांच्या ‘शेवंती’ या गाजलेल्या लघुकथेवर नीलेश कुंजीर या युवा दिग्दर्शकाने हा लघुपट बनवला आहे. घर दोघांचे असतं, ते दोघांनी सावरायचं….एकाने पसरवलं की दुसऱ्याने आवरायचं’ हे आपल्याला ऐकताना खूप आवडतं. पण प्रत्यक्षात ते घडतं का? की बायको एकटीच हा भातुकलीचा संसार मांडत-सजवत बसते? पुरुष कुठे असतो तेव्हा? हे विचार करायला प्रवृत्त करणारी ही कथा मनाला भिडली आणि म्हणून त्यावर लघुपट काढायचा ठरवला, असं निलेश कुंजीर यांनी सांगितलं. हा विषय केवळ दृश्यात्मक स्वरूपात अधिक प्रभावी ठरू शकेल, अशी खात्री वाटल्यानेच सिनेमात संवाद न ठेवता, केवळ पार्श्वनिवेदन आणि संगीताचा वापर करण्याचा वेगळा प्रयोग केला, असं कुंजीर यांनी सांगितलं. यावेळी, कथाकार चंद्रशेखर गोखले देखील उपस्थित होते. समाजात परिवर्तन घडवायचे असेल, तर जुन्या, निरुपयोगी संस्कार आणि विचारांचा त्याग करायला हवा, असं झालं, तरच स्त्री-पुरुष नातं, मग ते कोणत्याही वयातलं असो, शेवंतीच्या फुलासारखं फुलेल, असे त्यांनी सांगितले. निवेदन आणि संगीत, सुप्रसिद्ध संगीतकार मिलिंद इंगळे यांनी दिलेलं आहे. हा विषय इतका तरल होता आणि कलाकारांनी देखील सशक्त अभिनयातून भावना व्यक्त केल्यामुळे निवेदन आणि संगीत देणे सोपे गेले, असे इंगळे यांनी सांगितले. त्यांचा मुलगा सुरेल इंगळे यानेही त्यांना मदत केली आहे. आदिनाथ कोठारे आणि दीप्ती देवी ही जोडी या लघुपटात आहे. या चित्रपटाची, थर्ड आय एशियन फिल्म महोत्सव, चित्रभारती चित्रपट महोत्सव अशा महोत्सवासाठी देखील निवड झाली आहे.

दोन वेगवगेळ्या विषयांवरच्या या चित्रपटांना जोडणारा समान धागा म्हणजे, ‘पुरुषांनी केलेला स्त्रियांचा विचार!”. स्त्रीच्या सन्मानासाठी लढणे असो किंवा मग आपल्या सहधर्मचारिणीच्या अस्तित्वाची, प्रेमाची दखल घेणे असो, महत्वाचे आहे ते स्त्रियांच्या समस्या आणि भावविश्वाची पुरुषांनी घेतलेली दखल! ही सकारात्मक परिवर्तनाची नांदी आहे, असाच संदेश या दोन्ही चित्रपटांनी दिला आहे.

पत्र सूचना कार्यालयाच्या अधिकारी सोनल तुपे यांनी या पत्रकार परिषदेचे समन्वयक म्हणून काम पाहिले. हा महोत्सव येत्या तीन फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.