विरोधी पक्षनेत्यांसह नगरसेविकेला समन्स

खडकी न्यायालयाचे हजर राहण्याचे आदेश
कर्मचारी महिलेवर आरोप 

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील एका कर्मचारी महिलेवर भ्रष्टाचाराचे आरोप केल्याच्या प्रकरणात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विरोधी पक्षनेते दत्ता साने आणि नगरसेविका विनया तापकीर यांना खडकी न्यायालयाने समन्स बजावले आहे. महापालिकेतील कर्मचारी महिलेवरील आरोपासंदर्भात नगरसेवकांना न्यायालयात खेचण्याचे हे पहिलेच प्रकरण आहे.

महापालिकेतील विरोधी पक्षनेते दत्ता साने व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेविका विनया तापकीर यांनी महापालिका कर्मचारी मीटर निरीक्षक शितल चतुर्वेदी यांच्यावर मीटर विक्रीबाबत गैरव्यवहार करत असल्याचे आरोप केले होते. त्यातून चतुर्वेदी यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली. चतुर्वेदी यांनी आपल्याविरुद्ध खोट्या आरोपाच्या आधारे चुकीची कारवाई झाल्याचा दावा केला तसेच याबाबत महापालिका प्रशासनाकडे दाद मागितली होती. परंतु, त्याचा विचार न झाल्याने त्यांनी खडकी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. दत्तात्रय साने व विनया तापकीर यांनी आपल्याविरुद्ध बदनामीकारक वक्तव्य करून लाच घेण्याचे आरोप केले तसेच त्याचा व्हिडीओ व्हायरल केल्याचा आरोप चतुर्वेदी यांनी केला.

महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे खोटी तक्रार केल्याने आपल्यावर निलंबनाची कारवाई झाली. त्यांच्याकडे कोणतेही सबळ पुरावे नसताना कट रचून खोट्या माहिती पसरवून बदनामी केली. तसेच आयुक्तांसमोर आपल्याला अपमानित केल्याचे म्हणणे चतुर्वेदी यांनी खडकी न्यायालयापुढे मांडले. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. के. सोनवणे यांनी दत्तात्रय साने व विनया तापकीर यांना समन्स बजावला आहे. तसेच भारतीय दंड विधान संहिता 500 नुसार न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले. चतुर्वेदी यांच्या वतीने न्यायालयात ऍड. एन. डी. पाटील, ऍड. पुष्कर पाटील, ऍड. अनुज मंत्री, ऍड. करिश्‍मा पाटील, ऍड. शुभांगी जेटीचोर, ऍड. रेश्‍मा सोनार यांनी कामकाज पाहिले.

Leave A Reply

Your email address will not be published.