केडगाव परिसरातील शेतकरी, नागरिकांना होणार फायदा
केडगाव – केडगाव (ता. दौंड) परिसरातील फाटा क्रमांक 22 ला बेबी कालव्यातून उन्हाळी आवर्तन सोडण्यात आले आहे. फेब्रुवारी महिन्यात उन्हाचा चटका वाढू लागल्यानंतर शेतीतील पिकांना पाण्याची नितांत आवश्यकता असते, त्यानुसार बेबी कालव्यातून सध्या आवर्तन सुरू करण्यात आले आहे. उन्हाळी आवर्तनामुळे कालव्याच्या बाजूला असणाऱ्या विहिरी आणि कूपनलिका यांच्या पाणी पातळीत वाढ होण्यास मदत होणार आहे. चालू वर्षी पाऊस समाधानकारक झाला.
धरणक्षेत्रात सध्यातरी मुबलक पाण्याचा साठा उपलब्ध आहे. त्याला जोड बेबी कालव्यातून येणाऱ्या आवर्तनाची आहे. याचा अंदाज घेऊन शेतकऱ्यांनी शेतीत पिकांची लागवड केली आहे. ऊसाला प्रतिटन 3 हजार रुपये बाजारभाव मिळत असल्याने ऊस लागवडीकडे प्रामुख्याने बळीराजाचे लक्ष आहे. कांद्याने शेतकऱ्यांना चालू वर्षी आर्थिक हातभार दिला असल्याने या पिकाच्या लागवडीतही शेतकरी रस दाखवीत असल्याचे दिसत आहे.