उन्हाळ्याच्या सुट्टीचा आनंद आता क्रिकेटमध्ये!

शहरातील विविध गल्ल्यांमधून मुलांचा क्रिकेटचा खेळ रंगतोय

कात्रज – हुश्‍श… आता परीक्षा झाली. शाळेच्या अभ्यासाचा तणाव गेला. सुट्टीही लागली. आता काय मज्जाच मज्जा! अशा वातावरणात मुले शहरात सध्या गल्लोगल्ली रस्त्यांवरती दुपारच्या वेळेस क्रिकेट खेळताना दिसत आहेत. दुपारच्या वेळी वाहनांची रहदारी कमी असल्याने मुले विविध खेळांमधून आनंद घेत आहेत.

धनकवडीतील बालाजीनगर येथील रस्त्यांवर अशी मुले खेळताना दिसत आहे. प्राथमिक व माध्यमिक शाळेमधील परीक्षा संपल्या असून विद्यार्थ्यांना आता सुट्ट्या लागलेल्या आहेत. त्यामुळे क्रिकेट हा सर्वांचाच आवडीचा खेळ आहे. शिवाय भारतामध्ये सध्या आयपीएलची धूम आहे. त्यामुळे क्रिकेट हा प्रत्येकाच्या आयुष्यातील आवडता खेळ आणि त्याला खेळायला मैदानात हवे अशी अट नाही. त्यामुळे हा खेळ कोठेही खेळला जातो. हे वैशिष्ट्य आहे. पुणे शहरामध्ये सध्या नागरिक उन्हाळ्याने हैराण झाले आहेत. त्यामुळेच रस्त्यांवरती वाहनांची रहदारी देखील कमी आहे. त्याचाच परिणाम शहरातील अंतर्गत रस्त्यामध्ये देखील वाहने दुपारच्या वेळेस कमी असतात. याचाच फायदा घेत ही मुले या रस्त्यावर आपला खेळ मांडत आहेत.

स्टम्पसाठी स्टूल आणि गोलंदाजीसाठी एक स्टूल. बॅट-बॉल आणि दोन-चार सवंगडी. आणि मग, सुरू क्रिकेटची मज्जा. तास-दोन तास जोपर्यंत वाहनांची गर्दी रस्त्यावर होत नाही तोपर्यंत आपला खेळ खेळून मोकळी होतात. वाहने नसल्यामुळे क्रिकेटसाठी हा रस्ता त्यांचा मैदान होतो आणि सोसायटी किंवा इमारतीतील नागरिक त्यांचे प्रेक्षक. मुलेही अशा कुशलतेने हा खेळ खेळतात की खेळताना चेंडूबरोबर रस्त्यावरच गेला पाहिजे. इकडे तिकडे इमारतीमध्ये चेंडू जाता कामा नये. अशाच पद्धतीने भारतामध्ये मोठमोठे क्रिकेटर अशा गल्ल्यांमधून तयार झालेले आहेत.

या लहान मुलांना एक प्रश्‍न विचारला की, तुम्ही मैदानावर क्रिकेट खेळायला का जात नाही रे? तेव्हा ही मुले म्हणतात की, आम्हाला जवळपास खेळायला मैदान नाही. जरी असली तरी ती खूप लांब आहेत. तिथे उन्हामध्ये खेळण्यापेक्षा इथे इमारतींच्या सावलीला दुपारच्या वेळेस खेळणे कधीही चांगले. संध्याकाळी मग आम्ही जातो बागेमध्ये वेळ घालवायला. मुले इतकी समजूतदार झाली, असे मत ज्येष्ठांनी व्यक्त केले. नाहीतर आज प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाइल आल्याने मुले खेळ विसरूनच गेली आहेत की काय? असे वाटते. पण हे असे खेळ खेळताना समाधान वाटते. नाहीतर मोबाइल गेम्समुळे मुले घर सोडत नाहीत किंवा एकमेकांशी बोलत देखील नाही. मात्र, असे चित्र सर्वच ठिकाणी नाही. मुले शारीरिक खेळांमध्ये देखील पुढे गेलेली आहे. फक्त आता यांना जवळपास मैदानी उपलब्ध झाली पाहिजे. तेव्हा कुठे चांगले चांगले क्रिकेटपटू तयार होतील, असे मत ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्त केले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.